Vijay TVK Support update on Lok Bhavan : तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी विजय यांच्या ‘टीव्हीके’चा (TVK) मार्ग मोकळा झाल्याचे चित्र असतानाच शुक्रवारी एक नवा पेच निर्माण झाला. तीन दिवसांत तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेऊन विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस (५), डावे पक्ष (४) आणि आययूएमएल (IUML) व व्हीसीके (VCK) यांच्या पाठिंब्याने त्यांनी ११७ चा आकडा गाठल्याचे मानले जात होते. मात्र, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना पुन्हा रिकाम्या हाती परत पाठवले.

आजचा शपथविधी कार्यक्रम रद्द

राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विजय यांच्याकडे अद्याप बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही. विजय यांनी राज्यपालांना ११७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. २३४ सदस्यांच्या विधानसभेत १०८ जागा जिंकून विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, विजय दोनपैकी एक जागा सोडणार असल्याने पक्षाचे संख्याबळ १०७ वर आले आहे. या पत्रात काँग्रेसचे ५, डाव्यांचे ४ आणि एएमएमकेच्या (AMMK) एका आमदाराच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश होता. विजय यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता शपथविधीसाठी वेळ मागितली होती.

विजय यांनी सादर केलेल्या आमदाराची स्वाक्षरी बनावट?

विजय यांच्या दाव्यानंतर ३० मिनिटांतच एएमएमकेचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरण यांनी राज्यपालांना फोन करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या पक्षाच्या एकमेव आमदाराची स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप दिनकरण यांनी केला. काही वेळातच आमदार कामराज यांच्यासह दिनकरण यांनी राज्यपालांची भेट घेऊन ‘टीव्हीके’वर घोडेबाजाराचा आरोप केला. कामराज यांनी ती स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितले, ज्यामुळे विजय यांचे संख्याबळ ११६ वर आले. दुसरीकडे, टीव्हीकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यात कामराज विजय यांना पाठिंब्याचे पत्र लिहिताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, डीएमके आघाडीतील व्हीसीके पक्षाने अद्याप पाठिंब्याचे कोणतेही पत्र राज्यपालांना दिलेले नाही. विजय यांनी वैयक्तिकरित्या संपर्क न साधता केवळ व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पाठिंबा मागितल्याने व्हीसीकेने त्यांना ‘अहंकारी’ म्हटले आहे.

तसेच, आययूएमएलने (IUML) रात्री उशिरा स्पष्ट केले की, ते डीएमकेसोबतच असून त्यांनी विजय यांना कोणताही पाठिंबा दिलेला नाही. या सर्व घडामोडींमुळे विजय बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिले असून शनिवारी होणारा त्यांचा शपथविधी टळला आहे. जोपर्यंत विजय ११८ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र आणत नाहीत, तोपर्यंत त्यांना शपथविधीसाठी बोलावले जाणार नाही, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. तामिळनाडूचे हे राजकीय नाट्य आता अधिकच रंजक वळणावर पोहोचले आहे.