तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका ३ वर्षांच्या चिमुरडीला बिस्किटाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, ज्यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील एका परप्रांतीय मजुराला अटक केली आहे.या धक्कादायक घटनेनंतर तामिळनाडूमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि त्यांच्या ‘टीव्हीके’ सरकारला धारेवर धरले आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

‘हिंदुस्तान टाइ्म्स’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध वृत्तानुसार, पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. पीडितेचे कुटुंब तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुम्मिडीपुंडी येथील ‘सिपकोट’ औद्योगिक वसाहतीमध्ये राहत होते. रविवारी आरोपीने चिमुरडीला बिस्किटाचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शोध घेतला असता, ती झुडपात गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीला पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता, मात्र आता मुलीच्या मृत्यूनंतर यामध्ये हत्येचे कलम जोडण्यात आले आहे.

राजकीय वाद पेटला; ‘डीएमके’ आणि ‘अण्णाडीएमके’ आक्रमक

मुख्यमंत्री विजय यांनी काही दिवसांपूर्वीच महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सिंगापेन स्पेशल फोर्स’ सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल

“या घटनेमुळे मला तीव्र धक्का बसला आहे. तमिळनाडूतील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी निवडणुकीत मतांसाठी लहान मुलांचा वापर केला, पण आता ते मुलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहेत. सरकारने तातडीने कडक पावले उचलली नाहीत, तर ‘डीएमके’ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.” अशा कडक शब्दांत विरोधी पक्षनेते, डीएमके उदयनिधी स्टालिन यांनी प्रतिक्रिया दिली.

“तमिळनाडूमध्ये महिलांची सुरक्षा कुठे आहे? पोलिसांचा धाक उरलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा कारभार म्हणजे निव्वळ देखावा आहे. तुमची ‘सिंगापेन’ विशेष तुकडी आता कुठे गेली? कायदा व सुव्यवस्था सुधारण्यावर सरकारने तात्काळ भर दिला पाहिजे.” अशी प्रतिक्रिया अण्णाडीएमके सरचिटणीस एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी दिली.

तसेच के. अन्नामलाई यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तमिळनाडू राज्यात संतापाची लाट पसरली आहे.