Tamil Nadu Crime News : देशातील विविध शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. यामध्ये खून, दरोडा, बलात्कार यासारख्या अनेक घटना घडतात. आता तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यातील राधापुरममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजाऱ्याबरोबरील वैमनस्यातून एका तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमधील राधापुरम येथे शेजाऱ्याबरोबर असलेल्या वैमनस्यामधून एका तीन वर्षाच्या निष्पाप मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्या महिलेने त्याचा मृतदेह एका गोणीत टाकून वॉशिंग मशीनमध्ये लपवला. या घटनेचा पोलिसांनी तपास करत आरोपी महिलेला अटक केली आहे.

हेही वाचा : Dhanbad BCCL News: केंद्रीय मंत्र्याचे अधिकाऱ्याने बूट काढले, पायजम्याची नाडी बांधली?, व्हिडीओ व्हायरल; विरोधकांनी उठवली टीकेची झोड

पोलिसांच्या माहितीनुसार घडलं असं की, राधापुरम परिसरात एक कुटुंब राहत होतं. ते त्या ठिकाणी मोलमजुरीचं काम करतात. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा जवळच्या अंगणवाडी शाळेत जात असे. मात्र, एक दिवस अचानक तीन वर्षांचा मुलगा गायब झाला. त्यानंतर त्या मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. दिवसभर मुलाचा शोध घेऊनही मुलाला सापडला नाही. त्यानंतर त्यांनी त्या परिसरात असलेल्या पाणवठ्यांमध्ये शोध घेतला. मात्र, तेथेही मुलगा मिळून आला नाही. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि राधापुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि मुलाची चौकशी सुरु केली. तपासादरम्यान लोकांनी पोलिसांना सांगितलं की, मुलगा समोरच्या घरी गेला होता. त्यानंतर पोलिसांनी थंगम नावाच्या एका ४० वर्षीय महिलेची तिच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, पोलिसांना त्या महिलेच्या बोलण्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला संशयाच्या भोवऱ्यात ठेऊन तपास तीव्र केला. त्यानंतर त्या महिलेच्या घराची झडती घेतली आणि सर्वांना धक्का बसला.

यावेळी एका तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह एका गोणीत टाकून वॉशिंग मशीनमध्ये लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी वॉशिंग मशिनमधून मुलाचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी राधापुरमच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. तसेच या हत्येच्या प्रकरणात थंगमला या महिलेला पोलिसांनी अटक केली.