TVK Party Government Formation Suspense: चार दिवसांपूर्वी म्हणजेच ४ मे रोजी तमिळनाडूसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. आसाम व पुदुच्चेरीमध्ये पुन्हा भाजपा, केरळमध्ये यूडीएफ, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा मोठा पराभव तर तमिळनाडूमध्ये द्रमुक-अण्णाद्रमुकला धक्का देत अभिनेता विजयच्या TVK पक्षानं जोरदार मुसंडी मारली. राज्याच्या निवडणुकांमध्ये टीव्हीके १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. खुद्द विजयनं दोन मतदारसंघांतून मोठा विजय मिळवला. त्यातल्या एका मतदारसंघाचा त्याला राजीनामा द्यावा लागला, तरी सध्या टीव्हीकेकडे १०७ जागा आहेत. पण बहुमतासाठीचा ११८ हा आकडा गाठण्यासाठी अजूनही त्यांना ११ जागांची आवश्यकता आहे. पण तिथूनच सगळा राजकीय गोंधळ सुरू झाला.

सध्या तमिळनाडूच्या चेन्नईजवळ असणाऱ्या टीव्हीके पक्षाच्या कार्यालयात अनेक नवनिर्वाचित आमदार, यातले बरेच पहिल्यांदाच आमदार झालेले, ठाण मांडून आहेत. सत्तास्थापनेसाठी या सर्व आमदारांना राज्यभरातून चेन्नईत पाचारण करण्यात आलं होतं. इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आता सत्ता काही अंगुलीच दूर राहिल्याचं या सर्वांना जाणवलं आणि तेही मोठ्या उत्साहात चेन्नईत पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले. या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था चेन्नईजवळच्याच महाबलीपुरममधील वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये करण्यात आली आहे. रोजचा दिवस सत्तास्थापनेच्या चर्चा, दावे आणि राज्यपालांचा नकार यातच जात असल्याने आता तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे.

सत्तास्थापना दृष्टीपथात, पण हाती लागेना!

टीव्हीके पक्षाची अवस्था सध्या सत्तास्थापना दृष्टीपथात असूनही हाती काही लागत नाही अशी झाली आहे. काँग्रेसनं द्रमुकशी असलेली चार दशकांपासूनची युती तोडत आपल्या पाच आमदारांना टीव्हीकेच्या पाठिशी उभं केलं खरं. पण अजूनही बहुमताचा आकडा काही गाठता आलेला नाही. त्यामुळे त्यामुळे लागलीच शपथविधीच्या तयारीत चेन्नईत दाखल झालेल्या आमदारांची प्रतीक्षा संपायचं नाव घेत नाहीये. या काळात चेन्नईजवळच्या पानाईयूर भागातील पक्षाच्या कार्यालयातल्या स्थितीबाबत इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

“इथला फोन सदासर्वकाळ वाजतच असतो”, अशी काहीशी त्रस्थ प्रतिक्रिया एका नव्याने निवडून आलेल्या आमदारानं दिली. पक्ष कार्यालयातल्या फोनप्रमाणेच आमदारांजवळचे फोनदेखील सातत्याने वाजतच आहेत. यातले बहुतांश फोन हे त्यांचे हितचिंतक, नातेवाईक, सहकारी, मित्रमंडळींचे असतात. आधी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या जातात आणि मग ठरलेला प्रश्न विचारला जातो… “तुम्ही सरकार कधी स्थापन करणार?”

“उत्तर देण्याची आमची परिस्थिती नाही”

दरम्यान, फोनवर विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नसल्याचं पक्ष कार्यालयात वावरणारे आमदार हताशपणे सांगताना दिसतात. “सरकार नेमकं कधी स्थापन होणार? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या स्थितीत आम्ही आत्ता नाही आहोत. हे उत्तर देणं फार अवघड आहे”, अशी प्रतिक्रिया एका आमदारानं दिली.

पक्ष कार्यालयापासून काही अंतरावरच महाबलीपुरममधल्या अनेक रिसॉर्ट्समध्ये या आमदारांची तात्पुरत्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. “आमच्या पक्षाचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे. त्यांना खात्री आहे की आम्ही पक्षाला फसवणार नाही, पक्षांतर करणार नाही, घोडेबाजारात सहभागी होणार नाही. त्यामुळेच या रिसॉर्टमध्ये राहणंही आम्हाला बंधनकारक नाही”, असं सांगतानाच संबंधित आमदारानं हळूच दुसऱ्या कुणाशीतरी बोलताना “आम्ही जेवायला बाहेर जाऊ शकतो का?” असं विचारून घेतलं!

पक्ष कार्यालयात सुविधा अपुऱ्या, पण उत्साह काठोकाठ!

पहिल्याच प्रयत्नात आपला पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे TVK च्या पक्ष कार्यालयात आमदारांचा उत्साह दांडगा असल्याचं दिसून येत आहे. पण कार्यालयातील इतर सुविधा मात्र यथातथाच आहेत. नव्यानेच बांधलेल्या एका इमारतीतील दोन मोठ्या हॉलचा वापर सध्या टीव्हीके पक्ष आपल्या कार्यालयासाठी करत आहे. तिथे आलेल्या आमदारांची व्यवस्था पाहण्यासाठी पक्ष कार्यकर्ते झटत असल्याचंही दिसून येतं. सर्व सुखसोयी नसलेल्या या कार्यालयात आपल्याला कशाचीही कमतरता जाणवत नसल्याचं हे आमदार मोठ्या उत्साहात सांगतात.

“इथे फक्त दोन मोठे हॉल आहेत. हे इतर पक्षांचं असतं तसं सर्व सोयी-सुविधांनी युक्त असं कार्यालय नाही. पण आमच्यातले अनेकजण हे रस्त्यावर उतरून काम केलेल कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही आमची व्यवस्था स्वत:च करू शकतो. आम्हाला जास्त कुठल्या गोष्टींची अपेक्षा नाही”, असं एका आमदारानं सांगितलं. “इथे जेवणाचा स्पेशल मेन्यू वगैरेही नाही. पण आम्ही सारंकाही निभावून नेत आहोत. शेवटी हा एखाद्या दिवसाचाच प्रश्न आहे ना”, असा विश्वासदेखील एका आमदारानं व्यक्त केला.

बाहेर गदारोळ, आत शांतता!

दरम्यान, बाहेर सत्तास्थापनेचा गोंधळ चालू असताना पक्ष कार्यालयातल्या आमदारांमध्ये शांतता असल्याचा दावा काही आमदारांनी केला. “बाहेरच्या प्रत्येकाला हे जाणून घेण्यात रस आहे की आतमध्ये काय चालू आहे? पण आम्ही इथे फक्त बसलो आहोत. इकडे-तिकडे फिरतो आणि शपथविधीसाठीच्या फोनकॉलची वाट पाहात आहोत. आम्हाला चिंता नाही. आम्ही या निवडणुका जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सरकार स्थापन करणार”, असं एका आमदारानं छातीठोकपणे सांगितलं!