चेन्नई : सरकार स्थापन करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून करत असलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ‘टीव्हीके’ पक्षाचे प्रमुख विजय यांना तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. काँग्रेसने आधीच पाठिंबा दिलेल्या टीव्हीकेला डाव्या पक्षांसह इतर लहान पक्षांनी पाठिंबा दिल्याने शनिवारी विजय यांचा शपथविधी होणार आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये अपेक्षेप्रमाणे  भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली असून शनिवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री असणार आहेत.

तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक १०८ जागा जिंकून विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) हा सर्वात मोठा पक्ष ठरला.  मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ११८ च्या बहुमताच्या आकड्यापासून हा पक्ष दूर होता. टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची आवश्यकता होती. काँग्रेस, माकप व भाकप यांनी पाठिंबा दिल्याने ‘टीव्हीके’ बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. प्रत्येक दोन जागा जिंकलेल्या व्हीसीके व इंडियन युनियन मुस्लीम लीगने पाठिंब्याचे संकेत दिले असल्याने विजय यांचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

डाव्या पक्षांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर टीव्हीके प्रमुख विजय यांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण मिळावे, यासाठी शुक्रवारी लोकभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी विजय यांना सत्ता स्थापन करण्यास मंजुरी दिली.

विजय यांच्याकडून डाव्या पक्षांचे आभार

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विजय यांनी भाकप आणि माकप कार्यालयांना भेट घेत सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. ‘माकप’ने अधिकृत पत्राद्वारे सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला. तर भाकपने तामिळनाडूच्या जनतेसाठी स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासनासाठी विजय यांच्या पक्षाला सशर्त पाठिंबा दिल्याचे सांगितले.

– व्हीसीकेने टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत तात्काळ कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, पक्षप्रमुख थोल थिरुमावलवन यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका डाव्या पक्षांनी घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत असेल, असे सांगितले. 

एका जागेचा प्रश्न

विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून ‘टीव्हीके’ तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु या पक्षाचे प्रमुख विजय चेन्नईतील पेराम्बूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन जागांवरून निवडून आले आहेत. नियमानुसार त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विजय यांनी एक जागा सोडल्यास विधानसभेत पक्षाचे प्रभावी संख्याबळ ११८ होईल.

सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड

’पश्चिम बंगालमधील भाजपच्या प्रचाराचा चेहरा म्हणून उदयास आलेले ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे ते बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

’बंगालमध्ये अधिकारी यांचा शपथविधी सोहळा शनिवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार आहे. बंगालचे नेते आणि मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये झाली.

’या बैठकीला नवनिर्वाचित भाजप आमदार, केंद्रीय निरीक्षक आणि राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. गृहमंत्री शहा यांनी अधिकारी  यांची विधिमंडळ पक्षनेते पदाची औपचारिक घोषणा केली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

केरळमध्ये काँग्रेस निरीक्षकांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे  

केरळमध्ये नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने पाठवलेल्या दोन निरीक्षकांनी आपला अहवाल शुक्रवारी पक्षश्रेष्ठींकडे सादर केला. मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.