काही लोकांना वाईट स्वप्न पडत असतात. सतत वाईट स्वप्न पडत असली की त्याचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. त्यातून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशीच एक घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. सतत पडणारी वाईट स्वप्ने आणि भुताच्या भीतीतून एका पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कडलोर जिल्ह्यात ही घटना घडली असून प्रभाकरन असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे.

प्रभाकरनला भूताची भीती वाटत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याच्या मनात भुताची भीती बसली होती. त्यामुळे तो सतत घाबरलेला असायचा. प्रभाकरनची तब्येत गेल्या अनेक दिवसापासून खराब होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याला भयानक स्वप्नेही पडायची, ज्यामुळे तो खूप घाबरायचा. यासंदर्भात न्यूज १८ने वृत्त दिलंय.  

गेल्या काही काळापासून त्याला एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत होते. यामध्ये तो जळालेल्या महिलेचा गळा आवळून खून करतो. त्यामुळे त्रासलेल्या प्रभाकरनने ज्योतिषांचीही मदत घेतली. बरे होण्यासाठी त्याने १५ दिवसांची सुट्टीही घेतली होती. याच दरम्यान, त्याची मुलं व पत्नी एका लग्न समारंभाला गेले असता त्यांने राहत्या घरी गळफास लावून घेतला. कुटुंबीय परत आले तेव्हा त्यांना प्रभाकरनचा मृतदेह लटकलेला दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे.