चेन्नई : तमिळनाडूच्या २०२६च्या विधानसभा निवडणुकीत ‘टीव्हीके’ आणि ‘डीएमके’मध्येच थेट लढत होईल, असे विजय यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अनेकांना हा युक्तिवाद पटला नव्हता. केवळ याच मुद्द्यावर टीव्हीके आणि विजय हे प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा वेगळे ठरल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. विजयन यांनी आपल्या टीव्हीकेत द्रविडियन विचारधारा आणि तमिळ राष्ट्रवाद यांचा अतिशय कल्पकतेने मिलाफ केला.

५१ वर्षीय विजय यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा फेब्रुवारी २०२४ मध्ये केली होती आणि पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष स्थापन करण्यात आला. अभिनेता ते राजकारणी बनलेल्या विजय यांचे निवडणूक पदार्पण त्यांच्या ‘चित्रपट एंट्री’प्रमाणेच अनेक्षित ठरले.

२७ सप्टेंबर २०२५ रोजी करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू होऊनही विजय यांनी विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय यांची लोकप्रियता आणि त्यांचा मोठा चाहतावर्ग यांनी पक्षाच्या बाजूने निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

एनटीआर यांच्या पावलावर पाऊल

टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते एनटीआर यांच्यात एक अनोखे साम्य दिसून आले आहे. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) संस्थापक एन. टी. रामाराव (‘एनटीआर’ नावाने लोकप्रिय) यांच्यानंतर, स्वत:चा पक्ष स्थापन केल्याच्या दोन वर्षांच्या आत निवडणुकीत यश मिळवणारे विजय हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

थलपती ते मुथलवार

  • विजय यांनी १९८४ मध्ये आपल्या वडिलांच्या (एस. ए. चंद्रशेखर) ‘वेत्री’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.
  • १८ व्या वर्षी ‘नाळय तीरपू’ (१९९२) मधून मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यांच्या दुसर्‍या चित्रपटात (सेंदूरपांडी, १९९३) ते विजयकांत यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होते.
  • विजय यांनी तिसर्‍या चित्रपटापासूनच (रसिगन, १९९४) ‘इलय थलपती’ ही पदवी वापरण्यास सुरुवात केली. विजय यांनी ‘थलपती’वरून ‘थलायवन’ (नेता) आणि ‘मुथलवार’ (मुख्यमंत्री) अशा प्रवासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.