लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं संसद आणि संसदेच्या परिसरातील वर्तन योग्य नसल्याचा आरोप भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे. राहुल गांधींचं वर्तन असं आहे की आम्हा महिलांना त्याची लाज वाटते. राहुल गांधींच्या वर्तनापेक्षा त्यांची बहीण प्रियांका गांधी या खूपच चांगल्या पद्धतीने वागतात. राहुल गांधी हे एखाद्या टपोरीप्रमाणे संसद परिसरात येतात अशी टीका कंगना रणौतने केली आहे.
कंगनाने नेमकं काय म्हटलंय राहुल गांधींबाबत?
“राहुल गांधी एखाद्या टपोरीसारखे संसदेत येतात. त्यांचं वर्तन चांगलं नाही. महिला खासदार त्यांच्याकडे पाहून अवघडतात. ऐ, तू अशी भाषा वापरतात. त्यांची वागणूक अजिबात चांगली नाही. तरतम भाव त्यांच्याकडे मुळीच नाही. त्यांच्या तुलनेत प्रियांका गांधी खूप चांगल्या आहेत. त्यांची वागणूक अशी नाही. त्या खूप चांगल्या पद्धतीने आणि नम्रतेने वागतात. राहुल गांधींनी जरा त्यांच्या बहिणीकडून शिकलं पाहिजे.” असं कंगनाने म्हटलं आहे. आता याबाबत राहुल गांंधी काही भाष्य करणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
राहुल गांधींच्या वर्तनाबाबत २०० जणांचं खुलं पत्र
मंगळवारी २०० हून अधिक नोकरदार, सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांनी राहुल गांधींना एक खुलं पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींच्या वर्तनाबाबत चिंता व्यक्त केली होती. संसदेच्या परिसरात राहुल गांधींचं वर्तन योग्य नाही. संसदेत वागायाचं कसं त्याचे काही नियम आहेत. मात्र राहुल गांधी ते कुठलेही नियम पाळत नाहीत. संसद हे देशातलं सर्वोच्च सभागृह आहे. या ठिकाणी जनतेसाठी कायदे तयार केले जातात. या परिसरात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे पण राहुल गांधी ते करत नाहीत असा उल्लेख पत्रात करण्यात आला होता. यासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा कंगनाने राहुल गांधी हे एखाद्या टपोरीप्रमाणे संसदेत येतात असं म्हटलं आहे.
सारा अली खानबाबत कंगनाने काय म्हटलं आहे?
केदारनाथ आणि बद्रीनाथ या ठिकाणी पूजा करायची असेल तर सारा अली खानला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागेल असं सांगण्यात आलं. याबाबत जेव्हा कंगनाला विचारणा करण्यात आली तेव्हा ती म्हणाली की, आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती सनातनी आहे. सनातनी म्हणजे काय तर ज्याचा आदि आहे ना अंत, सनातन हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. सनातन परंपरा ही आपली सांस्कृतिक ओळख आहे, त्यामुळे प्रतिज्ञापत्र लिहून दिलं तर त्यात हरकत काय? असंही कंगनाने म्हटलं आहे.
