झारखंडमधील तबरेज अन्सारी झुंडबळी प्रकरणात आरोपपत्रात नमूद केलेले सर्वआरोपींविरूद्धचे हत्येचे कलम पोलिसांनी हटवले आहे. तबरेज याचा मृत्यू ह्रदयक्रिया बंद पडल्यानेच झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. “ते (बळी घेणाऱ्या झुंडी) का थांबत नाही, तुम्हाला माहिती आहे का”, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

झांरखडमध्ये २२ वर्षीय तबरेज अन्सारी याला मोटारसायकल चोरल्याच्या संशयातून जमावाने खांबाला बांधून मारले होते. त्यानंतर तबरेजचा मृत्यू झाला होता. ही घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात ११ जणांना अटक केली होती. तसेच या घटनेमुळे दोन पोलिसांचे निलंबनही करण्यात आले होते. आरोपींविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत तबरेजच्या भावाने केल्यानंतर पोलिसांनी ३०२ कलम (हत्येचा) लावले होते. पोलिसांनी आरोपपत्रात लावलेले ३०२ कलम हटवले आहे. तबरेजचा मृत्यू ह्रदयक्रिया बंद पडल्याने झाल्याचे सरायकेलाच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तबरेज अन्सारी झुंडबळी प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्धचे हत्येचे कलम हटवल्याने खासदार असदुद्दीन ओवेसी भडकले आहेत. ओवेसी यांनी ट्विटवरून आपला संताप व्यक्त केला. “तुम्हाला माहिती आहे का? वारंवार झुंडबळी घेऊन आरोपींकडून त्याच्या क्लिप व्हायरल का केल्या जात आहेत? झुंडबळीची प्रत्येक घटना होऊन गेलेल्या झुंडबळीच्या घटनेपेक्षाही भयानक का असते? ते (बळी घेणारा जमाव) का थांबत नाहीत, तुम्हाला माहित आहे का? कारण, खटला कुमकुवत करण्याची मोठी संधी फिर्यादीना असते. ते उत्तमपणे करतात.”, असे सांगत ओवेसी यांनी या पोलिसांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.