तेलंगणात रोज तीन लाख व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल असे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सांगितले. त्यांनी आरोग्य विभागाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्याला मोठ्या प्रमाणावर लसमात्रा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रविवारी रात्री जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कोविड १९ विषाणूचा राज्यातील प्रसार आटोक्यात आला असून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात करोनाचा आणखी प्रसार होणार नाही.

मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांनी वरिष्ठ आरोग्य व वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या की, रोज तीन लाख लोकांचे लसीकरण करण्यात यावे. वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारी व खासगी शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या असून कोविडचा प्रभाव जाणवलेला नाही. त्यामुळे आता कोविड १९ विषाणूचा प्रसार वाढण्याची शक्यता नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ वर्षे वयावरील २.८० कोटी लोकांपैकी १.४२ कोटी लोकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्यातील ५३ लाख जणांना दुसरी मात्राही देण्यात आली आहे. १.३८ कोटी लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. शाळा, खासगी आस्थापनांचा वापर लसीकरण केंद्रासाठी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राव यांनी असे आवाहन केले की, लोकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. प्राणवायूचे प्रकल्प सज्ज ठेवण्यात यावेत. कोविड व इतर मोसमी रोगांचा उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.