राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी सपशेल इन्कार केला आहे. तथापि, राष्ट्रवादी पक्षासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असेही अन्वर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप हा जातीयवादी आणि हुकूमशाही असलेला पक्ष आहे. आमचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत. तथापि, अन्य पक्षांशी आघाडी करण्याचा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेससमोर खुला आहे, असे सांगून अन्वर यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली आहे. अन्य राज्यांमध्ये आम्ही स्वत:हून धर्मनिरपेक्ष शक्तींशी हातमिळवणी करू शकतो. बिहारमध्ये राजद, काँग्रेस, लोकजनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आघाडी करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. काही मतदारसंघातली जागावाटपाबाबत थोडी कुरबुर आहे, मात्र ती दूर होईल, असेही अन्वर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.