Tarique Rahman on India ties: बांगलादेशमध्ये झालेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (BNP) जोरदार विजय मिळवला. यानंतर पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी माध्यमांना संबोधित करताना हा जनादेश लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले. ढाका येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, हा विजय बांगलादेशचा आहे. लोकशाहीची बूज राखणाऱ्यांचा आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा हा विजय आहे. तसेच निवडणुकीनंतरच्या संक्रमण टप्प्यात नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भारताबाबत काय म्हणाले?
भारत-बांगलादेश संबंधांवरील प्रश्नाला उत्तर देताना तारिक रहमान म्हणाले, आम्ही परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय स्पष्ट भूमिका घेऊ. बांगलादेशचे हित आणि बांगलादेशी लोकांचे हित आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. आम्ही बांगलादेश आणि बांगलादेशींच्या हिताचे रक्षण करू, यासंबंधीचे परराष्ट्र धोरण नंतर ठरविण्यात येईल.
माजी पंतप्रधान शेख हसीना पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये तब्बल १८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी पक्षाने मोठा विजय मिळवला. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगलादेशी नागरिकांनी बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने कौल दिला. दोन दशकांनंतर बीएनपीने सत्ता मिळविली असून या पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे ३६ वर्षांनंतर या देशाला पुरुष पंतप्रधान लाभणार आहे.
कुणी किती जागा जिंकल्या?
‘बीएनपी’ पक्षाने २९७ पैकी २०९ जागा जिंकण्यात यश मिळवले आहे. तर पाकिस्तानशी जवळीक असणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी पक्षाला साधारण ६८ जागा जिंकल्या आहेत. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
बीएनपी पक्षाचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अभिनंदन केले होते. “बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो. हा विजय बांगलादेशातील जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

