Tarun Tejpal Convicted Rape Case 10 Years Of Rigorous Imprisonment: पत्रकार आणि ‘तेहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपालला गुरुवारी बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. तेजपाल यांना २०२१ मध्ये निर्दोष मुक्त करणारा सत्र न्यायालयाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज रद्द केला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तेजपालला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तेजपालने दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत दयेची याचना केली होती. तर गोवा सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “नाही म्हणजे नाही” असा संदेश देण्यासाठी कमाल शिक्षेची मागणी केली होती.

२०१३ मधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपालने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिला सहकाऱ्याने केला होता. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी २०२१ मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने तेजपालची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, या निकालावर आक्षेप घेत गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोठा खंडपीठात अपील केले होते. गोवा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी बाजू मांडली.

२०२१ मध्ये सत्र न्यायालयाने केले होते निर्दोष मुक्त

२०२१ च्या निकालात सत्र न्यायालयाने महिलेच्या वर्तनावर बोट ठेवत, त्यामुळे तिची केस कमकुवत झाल्याचे म्हटले होते. “तक्रारदार महिलेचे वर्तन, सलग दोन रात्री लैंगिक अत्याचार झालेल्या कोणत्याही पीडितेच्या सामान्य वर्तनासारखे दिसत नाही”, असे न्यायालयाने नमूद केले होते. आपल्या निकालात सत्र न्यायालयाने महिलेचे जुने संबंध, तिचे विचार, घटनेनंतरच्या फोटोंमध्ये ती आनंदी दिसणे, एका अभिनेत्याला रात्री उशिरा त्याच्या हॉटेल रूममध्ये सोडणे आणि मित्रांसोबतचे तिचे व्हॉट्सॲप चॅट्स या सर्व गोष्टींचा संदर्भ दिला होता.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी मांडली होती बाजू

न्यायालयात बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, “उलटतपासणीदरम्यान जणू काही पीडित महिलेचीच परीक्षा घेतली जात होती”, असे म्हणाले होते. “मद्यपान, धूम्रपानाच्या सवयींवरून आणि तिच्या वैयक्तिक विचारांवरून पीडितेला लक्ष्य करण्यात आले. लैंगिक संबंध हा काही टॅबू नाही असे तिला विचारण्यात आले. यावर पाडितेने परस्पर संमतीने असेल, तर त्यात काही वावगे नाही असे म्हटले”, अशी माहिती मेहता यांनी न्यायालयाला दिली.

“दारू किंवा सिगारेट पिणे अनैतिक आहे का? या प्रश्नाला देखील पीडितेने व्यक्ती प्रौढ असेल आणि तिच्या धर्माचा त्याला विरोध नसेल, तर यात काहीही अनैतिक नाही, असे उत्तर दिले. बचाव पक्षाने तिला अडकवण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांना न डगमगता तिने पहिल्या दिवसापासून आपली साक्ष ठाम ठेवली. मात्र, उलटतपासणीदरम्यान तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला”, असेही तुषार मेहता म्हणाले होते.