तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१३ मध्ये तरुण तेजपालने त्याच्या तहलका या मासिकात काम करणाऱ्या सहकारी महिलेवर दोनवेळा बलात्कार केला होता. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ ला ही घटना घडली होती. या प्रकरणात त्याला ३० नोव्हेंबर २०१३ ला अटक झाली. त्यानंतर २०१४ मध्ये त्याला जामीन मिळाला. तर मुंबई सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये या प्रकरणात त्याला पुराव्यांच्या अभावी निर्दोष सोडलं होतं. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय रद्द केला आणि तरुण तेजपालला दोषी ठरवलं. आता या प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तरुण तेजपालला दोषी ठरवलं गेल्यानंतर तो काय म्हणाला?
मी ६२ वर्षांचा आहे आणि मला वाटतं आहे की मीच पीडित आहे. माझी पत्नी आहे. यापेक्षा माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही. माझ्या शिक्षेबाबत खंडपीठाने सौम्यपणा दाखवावा. आम्ही या निर्णयाच्या विरोधात अपील करु शकतो. बाकी सर्व तथ्यांची नोंद न्यायालयाने घेतली आहे.सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तेजपालने आपण दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत दयेची याचना केली, तर गोवा सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “नाही म्हणजे नाही” असा संदेश देण्यासाठी कमाल शिक्षेची मागणी केली होती. ज्यानुसार गोवा खंडपीठाने तरुण तेजपालला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बलात्काराचं प्रकरण नेमकं काय?
प्रकरण नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित ‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमादरम्यान घडले होते. तरुण तेजपालने त्याच्यासह काम करणाऱ्या एका माजी कनिष्ठ महिला सहकाऱ्याचं लैंगिक शोषण केलं असा आरोप तिने केला होता. या महिलेने असा आरोप केला होता की, हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर २०१३ या दिवशी तरुण तेजपालला अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. सुमारे साडेसात वर्षांनंतर, २०२१ मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने पुराव्या अभावाचे कारण देत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरुद्ध गोवा सरकारने हायकोर्टात अपील केले होते. आता गोवा खंडपीठाने तो निर्णय रद्द करत तरुण तेजपालला दोषी ठरवलं, तसंच त्याला आता या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
