Tarun Tejpal Surrenders Goa Court: तेहलका मासिकेचा संस्थापक आणि माजी संपादक तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर सोमवारी त्याने गोवा न्यायालयात आत्मसमर्पण केले. तेजपालला आत्मसमर्पण करण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला होता, ही मुदत उद्या संपत आहे. तरुण तेजपालची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
म्हापसा न्यायालयात आत्मसमर्पण
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या महिन्यात तेजपालची निर्दोष सुटका करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या एकलपीठाने तेजपालला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. “याचिकाकर्त्याने दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करावे”, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.
बलात्काराच्या प्रकरणात दोषी
या प्रकरणात मे २०२१ मध्ये गोवा येथील म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तेजपालवरील सर्व आरोप फेटाळून लावत निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचे निष्कर्ष पालटून तेजपालला दोषी ठरवले. २०१३ साली घडलेल्या या बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने तरुण तेजपालला दोषी ठरवले.
१० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी तेजपालला २०१३ मध्ये सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, आपणच पीडित असल्याचा युक्तिवाद तेजपालने केला होता. आत्मसमर्पण करण्यापासून सूट मिळण्यासाठी तेजपालने केलेली विनंती गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. गोवा राज्याच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या अर्जाला विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, दोषी ठरवण्याच्या आदेशाला आव्हान देण्यापूर्वी आत्मसमर्पण करणे बंधनकारक आहे. नियमांनुसार आत्मसमर्पणाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
