पीटीआय, कोलकाता
“कोलकात्यामध्ये १९ वर्षांनी परत येताना माझ्या स्वतःच्या देशात आल्यासारखे वाटत आहे,” अशी भावना हद्दपार बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. आपल्या भेटीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विरोधी मतांचे संरक्षण यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होईल, अशी आशाही नसरीन यांनी बोलून दाखवली. त्या शनिवारी कोलकात्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तस्लिमा नसरीन यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकाने मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून २००३मध्ये पश्चिम बंगाल सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, तो वाद थांबला नाही आणि त्यांना २००७मध्ये कोलकाता शहर सोडावे लागले होते. त्यानंतर त्या प्रथमच शहरातील एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. कोलकात्याच्या रवींद्र सदन सांस्कृतिक केंद्र येथे ‘सेक्युलर मिशन’, ‘पश्चिमबोंगेर जोनो’ आणि ‘ह्युमन राइट्स बियाँड फ्रंटियर्स’ या संघटनांनी १ ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
‘पीटीआय’शी बोलताना नसरीन यांनी सांगितले की, इतकी वर्षे दूर राहूनही कोलकात्यासबंधी आपलेपणाची जाणीव कायम आहे. त्या म्हणाल्या, “परत येताना मला आनंद होत आहे आणि वेदनाही. कोलकाता हे केवळ माझे राहते शहर नव्हते. येथे माझे घर होते, मित्र, वाचक आणि आपलेपणाची भावना होती. माझी ही १९ वर्षे हिरावून घेतली गेली. ती परत भरून निघणार नाहीत.”
एखादी सीमा आखून किंवा तारांचे कुंपण घालून माझ्या हृदयातील बंगालचे कधीही विभाजन झाले नव्हते. सध्या तरी बंगालच्या पूर्व भागाचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत. बंगालचा हा भाग माझे घर आहे. – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका
