Taslima Nasreen on CJP protest Bangladesh unrest comparison: बांगलादेशातून हद्दपार केलेल्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी रविवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावर मोठे भाष्य केले. या आंदोलनाची तुलना त्यांनी २०२४ साली बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी केली. या विद्यार्थी आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधून बाहेर पडावे लागले होते. बांगलादेशमध्ये त्यावेळी जे घडले, त्यातून धडा घ्यावा, असे आवाहन तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.
कोलकाता येथे १९ वर्षांनी परतल्यानंतर तस्लीमा नसरीन यांचा सत्कार सोहळा ठेवला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी सीजेपीच्या आंदोलनावर भाष्य केले.
तस्लीमा नसरीन म्हणाल्या की, सध्या इथे जे घडत आहे, तसेच बांगलादेशमध्ये २०२४ च्या जुलै महिन्यात घडले होते. लोकांची त्यावेळी फसवणूक झाली. त्यातून बांगलादेशसाठी चांगला निकाल लागलेला नाही. जिहादींनी सत्ता काबीज केली आहे.
“Bangladesh's 2024 student movement fooled us.”
— News Arena India (@NewsArenaIndia) August 2, 2026
– Taslima Nasrin draws parallel with CJP protest pic.twitter.com/GpFKBqpkpe
बांगलादेशमध्ये काय झाले होते?
सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षण पद्धतीवर विद्यार्थी आणि युवकांनी नाराजी व्यक्त करत २०२३ साली बांगलादेशमध्ये मोठे आंदोलन छेडले होते. विद्यार्थ्यांचे आंदोलन काही दिवसांतच सरकारविरोधी आंदोलनात बदलले. हिंसाचार सुरू झाला. आंदोलकांवर पोलिसांच्या बळाचा वापर करण्यात आला. त्यानंतर मोठ्या संख्येने जमाव पंतप्रधानांच्या निवासावर चालून गेला. ज्यामुळे शेख हसीना यांना ताबडतोब देश सोडावा लागला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतली होती.
तेव्हापासून बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या आंदोलनानंतर हिंदूसह इतर अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करण्यात आले. जमावाच्या मारहाणीत अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली होती. तस्लीमा नसरीन म्हणाल्या की, अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदूंची परिस्थिती आणखीच बिकट झाली.
तस्लीमा नसरीन म्हणाल्या, “शेख हसीना सरकारच्या काळातही हिंदूंना अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. पण मोहम्मद युनूस यांच्या सरकारच्या काळात परिस्थिती आणखी चिघळली.”
मदरशांबाबत तस्लीमा नसरीन काय म्हणाल्या?
तस्लीमा नसरीन यांनी बांगलादेशमधील परिस्थितीला शिक्षणाचा अभाव आणि धार्मिक संस्थांचा वाढता प्रभाव जबाबदार असल्याचे म्हटले. “मदराशांमध्ये फक्त जिहादी जन्माला घातले जातात. सगळ्या मदरशांचं रुपांतर हे धर्मनिरपेक्ष शाळांमध्ये केले गेले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. बांगलादेशात खुल्या विचारांचे लोक राहू शकत नाहीत. आजही त्यांच्यावर पलायन करण्याची वेळ येते. ही बाब दुर्दैवी आहे”, असे विधान तस्लीमा नसरीन यांनी केले.
