Tata Ernakulam Express : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली शहराजवळील एलामानचिलीजवळ टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग लागल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वेच्या लोको पायलटने सावधगिरी बाळगत तातडीने ट्रेन थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.

टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये आग लागली तेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते. आगीची माहिती मिळताच संपूर्ण रेल्वेत मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आणि प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. त्यानंतर रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे थांबवली आणि पुढील अनर्थ टळला.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या बी १ आणि एम २ डब्यांमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, त्यानंतर सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता. या आगीत ट्रेनचे दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले होते.

दरम्यान, अनकापल्लीचे पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर ही आग लागली तेव्हा एका डब्यात ८२ आणि दुसऱ्या डब्यात ७६ प्रवासी होते. दुर्दैवाने कोच बी १ मधून एक मृतदेह आढळून आला. काही प्रवाशी किरकोळ जखमी देखील झाले आहेत. तसेच या आगीची घटना नेमकी कशामुळे घडली? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.