नवी दिल्ली : टाटा समूहातील नेतृत्व आणि कारभाराच्या पद्धतीवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी थेट राजकीय वर्तुळात उमटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टाटा समूहाची ‘गुन्हेगारी पद्धतीने वाताहत” होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. ‘भारतीय उद्योगजक गप्प का आहेत,’ असा सवालही त्यांनी केला. त्यावर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, व्यावसायिक आणि कायदेशीर विषयांना सरसकट गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधी यांनी बुधवारी ‘एक्स’वरून टाटा समूहातील वादावर भाष्य केले. “टाटा समूहाची गुन्हेगारी पद्धतीने वाताहत केली जात आहे आणि एकही उद्योगपती याबाबत बोलण्याचे धाडस करत नाही. तुम्ही किती काळ गप्प राहणार? ते (मोदी-शहा) तुम्हाला आपल्या नियंत्रणात घेईपर्यंत का,” असा सवाल राहुल गांधींनी केला.
‘प्रत्येक विषयाचे राजकीयीकरण करू नका’
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एक्स’वरून जोरदार टीका केली. “विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी प्रत्येक विषयाचे राजकीयीकरण करणे टाळावे. व्यावसायिक आणि कायदेशीर बाबींना सहजपणे गुन्हेगारी स्वरूप देणे स्वीकारले जाणार नाही”, असे सीतारामन म्हणाल्या. राहुल गांधी हे उद्योजकांना केंद्र सरकारविरोधात चिथावणी देत आहेत का, असा सवालही त्यांनी केला. टाटा समूहातील वादाच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्यानंतर, सीतारामन यांनी संविधान आणि न्यायव्यवस्थेचा दाखला दिला.
‘उद्योगाला रोजगार, विकासाचे साधन मानतो’
मोदी सरकार भारतीय उद्योगांकडे रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाचे साधन म्हणून पाहते. उद्योगाला पाठबळ देणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि उद्योजकतेला चालना देणे यासाठी सरकारने निश्चित धोरणे आखली आहेत, असे सीतारामन म्हणाल्या. ‘लायसन्स-कोटा राज’च्या माध्यमातून काँग्रेसने अनेक दशके भारतीय उद्योगांची गळचेपी केली. देशातील कोट्यवधी नागरिकांना गरिबीत लोटले, असा आरोप त्यांनी केला.
वाद काय?
‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या प्रक्रियेवर ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष नोएल टाटा यांनी आक्षेप घेतला आहे. २६ ऑक्टोबर रोजी कंपनी सचिवांना पाठवलेल्या पत्रात, बैठकीच्या मूळ अजेंड्यावर फेरनियुक्तीचा स्पष्ट उल्लेख नव्हता आणि आवश्यक निवड समितीची शिफारसही संचालक मंडळासमोर ठेवण्यात आली नव्हती, असा दावा त्यांनी केला. मतदानाची प्रक्रिया आणि आवश्यक संचालकांची संमती यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बैठकीचे ध्वनिचित्रमुद्रण, इतिवृत्त आणि संबंधित कागदपत्रे सात दिवसांत देण्याची मागणी त्यांनी केली. टाटा सन्समधील निर्णयप्रक्रियेवरून निर्माण झालेला हा वाद ट्रस्ट आणि संचालक मंडळातील मतभेद अधोरेखित करतो. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील सुमारे दोन तृतीयांश हिस्सा आहे. या वादात केंद्र सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला जात होता.
भारतातील उद्योगक्षेत्र हे मोदी आणि शहांचे खेळणे नव्हे. तुमच्यात धैर्य नाही; आमच्यात आहे. आम्ही या गुन्ह्यांसाठी न्याय मिळवून देऊ. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
उद्योग आणि उद्योजकांच्या यशावर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राविषयी अविश्वासाचे आणि विषारी वातावरण निर्माण होत आहे. – निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
