Tata Group takes over Air India : एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण; ६७ वर्षांनंतर पुन्हा लागला टाटांचा शिक्का!

एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून ठरल्यानुसार २७ जानेवारी रोजी अधिकृतरीत्या टाटा सन्सची मालकी प्रस्थापित झाली आहे.

Tata Group takes over Air India
एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे.

Tata officially takes over Air India : गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. आज टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आज सकाळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मालकी हस्तांतरण प्रक्रियेचा मुहूर्त चुकल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज ही प्रक्रिया पूर्ण न होता उद्या होणार असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, अखेर केंद्र सरकारने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली असून आता एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन झाली आहे!

कसा झाला व्यवहार?

एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना केंद्र सरकारने एअर इंडियामधून १०० टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. टाटा सन्सनं यासाठी लावलेली १८ हजार कोटींची बोली अखेर अंतिम करण्यात आली. मात्र, यावेळी एअर इंडियावर तब्बल १५ हजार ३०० कोटींचं कर्ज होतं. या कर्जाची रक्कम वगळता उरलेले २ हजार ७०० कोटी रुपये रोख स्वरूपात केंद्र सरकारला अदा करण्याचं टाटा सन्सनं मान्य केलं होतं. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, व्यापारमंत्री पीयूष गोयल आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एअर इंडियाच्या व्यवहारास ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

यानुसार एअर इंडियाकडून विविध टप्प्यांमध्ये २७०० कोटींही ही रक्कम सरकारला अदा करण्यात आली असून केंद्र सरकारने देखील आपले १०० टक्के शेअर्स टाटा सन्स आणि भागीदार कंपनी असलेल्या टेलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे आज अखेर एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये २००७ मध्ये विलीनीकरणानंतर ‘एअर इंडिया’चा तोटा वाढला होता. आता ‘टाटा सन्स’ला देशांतर्गत ४४०० आणि आंतरराष्ट्रीय १८०० उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे. परदेशात पार्किंगचे ९०० स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला १०० टक्के तसेच ५० टक्के वाटा मिळणार आहे.

एअर इंडिया पुन्हा टाटांकडेवाचा सविस्तर

टाटा ते पुन्हा टाटा व्हाया एअर इंडिया, असा झाला प्रवास

जहाँगीर रतनजी दादाभॉय म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली. १७ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले. या विमानाचे वैमानिक होते, जे. आर. डी. टाटा! १९४६मध्ये ‘टाटा सन्स’ने त्याचे विभाजन करून १९४८ मध्ये एअर इंडिया आणि युरोपातील उड्डाणांसाठी एअर इंडिया इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या स्थापन केल्या. ही खासगी-सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती. त्यात टाटांचा वाटा २५ टक्के होता तर सरकारचा वाटा ४९ टक्के होता, उर्वरित वाटा नागरिकांचा होता. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून ही विमान कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत एअर इंडियाच्या तोट्यात कमालीची वाढ झाली. त्यामुळे अखेर ही कंपनी पुन्हा खासगी क्षेत्रात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. करोना साथीमुळे जानेवारी २०२० मध्ये एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेस विलंब होत होता. या वर्षी पुन्हा एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. टाटा समूहाने डिसेंबर २०२० मध्येच ही कंपनी खरेदी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आज अखेर ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata group has officially taken over air india from the government on thursday pmw

Next Story
आता रुग्णालयांमध्ये मिळणार कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशी, अटींसह डीजीसीआयची मंजुरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी