नवी दिल्ली : सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. या विलिनीकरणानंतर नवीन कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सची २५.१ टक्के हिस्सेदारी राहील.
एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे येताच एअर इंडियामध्ये ‘विस्तारा’च्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. प्रस्तावित विलिनीकरण प्रक्रिया २०२४ मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे. सध्या टाटा समूहाची ‘विस्तारा’मध्ये ५१ टक्के हिस्सेदारी आहे तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. विस्तारा आणि एअर इंडियाचे विलिनीकरण केले जाईल आणि या व्यवहाराचा भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये २,०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सकडे असलेल्या १७.५ अब्ज सिंगापूर डॉलरच्या राखीव निधीमधून एअर इंडियाला ही रक्कम देण्याचा मानस असल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने म्हटले आहे. टाटा समूहही २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये एअर इंडियाच्या वाढीसाठी निधी देणार आहे.
सध्या टाटा समूहाकडे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या चार हवाई सेवा कंपन्यांची मालकी आहे. चालू वर्षांत जानेवारीमध्ये टाटा समूहाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते.
आंतरराष्ट्रीय सेवा देणारी देशातील अव्वल कंपनी
विस्ताराच्या विलिनीकरणानंतर २१८ विमानांच्या ताफ्यासह एअर इंडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान सेवा देणारी देशातील अव्वल तर देशांतर्गत विमान वाहतूक सेवा देणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरेल. विलिनीकरण व्यवहाराचा एक भाग म्हणून एअर इंडिया सेवा जाळे आणि विमानांचा ताफा दोन्हींमध्ये वाढ करण्यासह, ग्राहकसेवेत सुधारणा, सुरक्षा, विश्वासार्हता आणि वक्तशीर कामगिरी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
विस्तारा आणि एअर इंडियाचे विलिनीकरण हे एअर इंडियाला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची विमान वाहतूक कंपनी बनवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर दर्जेदार, किफायतशीर सेवा देणारी मजबूत ‘एअर इंडिया’ घडविण्यासाठी टाटा समूह प्रयत्नशील आहे.
-एन. चंद्रशेखरन, टाटा सन्सचे अध्यक्ष