Ayodhya Temple Museum : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी अयोध्येतील श्री रामाच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर आता अयोध्येचा विकास करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. अयोध्या हे शहर एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी योगी सरकार प्रयत्न करत आहे.
या पार्श्वभूमीवर योगी सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं राम मंदिर म्युझियम अयोध्येत उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. टाटा सन्सच्या माध्यमातून अयोध्येत उभारण्यात येणारे हे म्युझियम तब्बल ५२ एकरांमध्ये असणार आहे. या संदर्भातील वृत्त रेडिफने दिलं आहे.
अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की, टाटा सन्सने त्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून एक अत्याधुनिक मंदिर संग्रहालय विकसित करण्याची आणि चालवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत एक एसपीव्ही तयार करण्यात येणार आहे. तसेच या संग्रहालयासाठी जमीन देण्याबाबत त्रिपक्षीय सामंजस्य करार ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि टाटा सन्स यांच्यामध्ये झालेला आहे, असं मंत्री सुरेश खन्ना यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यापूर्वी अयोध्येच्या एका गावात २५ एकर सरकारी मालकीची जमीन ९० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. पण आता टाटा सन्सने या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेल्या व्याप्ती पाहता अधिक जमीन मागितली आहे. त्यानुसार अतिरिक्त २७.१०२ एकर जमीन आता गृहनिर्माण आणि नगररचना विभागाकडून पर्यटन विभागाला मोफत हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण प्रकल्प क्षेत्र ५२.१०२ एकर होईल, अशी माहिती मंत्री सुरेश खन्ना यांनी दिली आहे.
