रेल्वेच्या तात्काळ कोटा अंतर्गत तिकिट काढणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता ग्राहकांना प्रथम तिकिट बुक करून नंतर त्याचे पैसे देता येतील. ही सुविधा पूर्वी फक्त सामान्य तिकिटांच्या बुकिंगसाठी उपलब्ध होती. आता तात्काळ बुकिंगसाठी ही सुविधा महत्वपूर्ण ठरेल. याच्या मदतीने ग्राहकाला केवळ दोन क्लिकवर तिकिट बुक करता येईल. तसेच आयआरसीटीसीच्या ग्राहकाला आपल्या घरी तिकिटाची डिलिव्हरीही घेता येईल. यासाठी डिलिव्हरीचा पर्याय निवडून रोख किंवा डेबिट कार्ड अथवा क्रेडिड कार्डद्वारे पैसे देता येतील. आयआरसीटीसीसाठी ‘पे ऑन डिलेव्हरी’ सुविधा देणारी कंपनी अँड्युरिल टेक्नोलॉजिस प्रा. लि.ने याची बुधवारी घोषणा केली. इतकेच नव्हे तर काही क्षणात तात्काळ तिकिटे बुक होतील. यामुळे ग्राहकाचा वेळ वाचणार आहे.

आयआरसीटीसीद्वारे दररोज १,३०,००० तिकिटे काढली जातात. यातील बहुतांश तिकिटे ही तात्काळसाठी बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच बुक केली जातात. आतापर्यंत ग्राहकाला आयआरसीटीसीद्वारे त्यांचे तिकिट कन्फर्म करण्यापूर्वी स्टँडर्ड ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पैसे द्यावे लागत असत. या प्रक्रियेत वेळ लागायचा. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक तिकिट बुक करू शकत नव्हते. ‘पे ऑन डिलेव्हरी’ सेवेमुळे पेमेंट गेटवेची आवश्यकता पडत नाही. यामध्ये ग्राहकाला काही सेकंदातच तिकिट बुक करता येईल.

असा मिळेल ‘पे ऑन डिलेव्हरी’चा लाभ
– सर्वात प्रथम ग्राहकाला irctc.payondelivery.co.in वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे.
– आता आयआरसीटीसी पोर्टलवर बुकिंग दरम्यान, ग्राहकाला Anduril Technologies चा ‘pay-on-delivery’ पर्याय निवडावा लागेल.
– तिकिट बुक होण्याबरोबर तिकिट एसएमएस किंवा इ मेलद्वारे डिजिटली डिलिव्हर केले जाते. त्यानंतर बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आता पैसे देता येतील.
– त्याचबरोबर ग्राहक ऑनलाइन पैसे देऊ शकतो. यासाठी बुकिंगवेळी एक पेमेंट लिंक पाठवली जाते.

यासंबंधी अँड्युरिल टेक्नालॉजिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग वाजपेयी म्हणाले, तत्काल तिकिटसाठी पे ऑन डिलिव्हरी लाखो रेल्वे प्रवाशांसाठी लाभदायक आहे. पहिल्यांदा तिकिट बुक करून नंतर त्याचे पैसे देण्याच्या पर्यायामुळे ग्राहकाला मोठा फायदा होईल. अनेकजण हा पर्याय स्वीकारतील.