सोशल मीडियावर रोजच काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. अशातच आता असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो अत्यंत धक्कादायक आहे. कोचिंग क्लासवरून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला जमावाने घेराव घातला. या दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर अल्पवयीन तरूणीचे कपडे फाडत तिचा विनयभंग केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी सदर लोकांचा तपास करत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.

काय दिसतं आहे या व्हिडीओत?

अल्पवयीन मुलगी आणि मुलगा रस्त्याने परतत असतात. तेवढ्यात त्यांच्याभोवती एक जमाव येतो. हा जमाव या जोडप्याला मारहाण करू लागतो. त्यानंतर या जमावतले काही लोक मुलीचे कपडे फाडतात आणि तिचा विनयभंग करतात. ही मुलगी या जमावाला असं करू नका असं म्हणत विनंती करते. पण तिला उचलून एक जण दूर घेऊन जातो तिच्याशी असभ्य आणि अश्लाघ्य वर्तन करतो. हा व्हिडीओ नॅशनल क्राइम इनव्हेस्टिगेशन ब्युरो (NCIBHQ) यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. NCIB हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं काय घडलं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार दोघंही जण म्हणजेच अल्पवयीन मुलगा आणि मुलगी स्कूटरवरून येत असतात. तेवढ्यात काही लोकांचा जमाव या दोघांना घेराव घालतो. मारहाण करू लागतो. त्यांच्यातला एक जण दोघांनाही थोबाडीत ठेवून देतो. शिवाय त्यातला एकजण म्हणतो तुम्ही दोघंही फिरताय तुमच्या घरी सांगू का? तसंच त्यांच्यातला आणखी एक जण म्हणतो या दोघांच्या घरी कळवा हे दोघं भटकत आहेत. या नंतर हे दोघंही गयावया करत आहेत, दोघंही माफी मागताना दिसत आहेत. पण जमावातल्या लोकांनी ऐकून घेतलं नाही. एकाने मुलीला खांद्यावर उचललं आणि तिचे कपडे फाडले. मुलाचा शर्ट पकडून त्याच्या शर्टची कॉलरही फाडली. या प्रकरणाचे दोन व्हिडीओ असून ते दोन्हीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोन्ही व्हिडीओ बिहारचे आहेत असंही समजलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

NCIB ची पोस्ट नेमकी काय आहे?

महिलांबाबत सन्मान बाळगणं, संवेदनशील विचार करणं ही कुठल्याही सभ्य समाजाची विचारधारा असते, ओळख असते. अशा प्रकारचे संस्कारच न्यायपूर्ण आणि उज्ज्वल समाजाचा पाया रचतात. अशातच बिहारमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही स्थानिक लोक एका जोडप्याला कथित दृष्ट्या मारहाण करत आहेत. तसंच मुलीसह अत्यंत अश्लाघ्य वर्तन करत आहेत. या व्हिडीओची सत्यता पटली आणि व्हिडीओत जे लोक मुलीशी असभ्य वर्तन करत आहेत त्यांची ओळख पटली तर बिहार पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई केली पाहिजे. या मुलीचा विनयभंग करणाऱ्यांना आणि तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या या तरूणांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं NCIB ने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलंं आहे.

NCIB ने उपस्थित केलेले प्रश्न काय?

१) अशा प्रकारच्या घटना खुलेआम कशा काय घडतात?

२) कुठल्याही महिलेसह किंवा जोडप्यासह असभ्य वर्तन करण्यात आलं तर ते थांबवण्याच्या ऐवजी त्याचे व्हिडीओ कोण पोस्ट करतं?

३) तसंच अशा पद्धतीने एखाद्या महिलेला मारहाण होत असेल, तिचा लैंगिक छळ होत असेल तर व्हिडीओ काढणारे लोक तिला वाचवायला का नाही धावले? असं म्हणत NCIB ने ही पोस्ट केलीआहे.