१४ वर्षांच्या एका मुलीने वडिलांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केला आणि आईने विवस्त्र फोटो काढले म्हणत आपल्याच आई वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना गुजरातमधल्या कच्छ या ठिकाणची आहे. पोलिसांनी या मुलीच्या तक्रारीनंतर POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कच्छ येथील अंजार भागात ही मुलगी तिच्या तीन बहिणींसह आणि आई वडिलांसह राहते. हे कुटुंब वेगळ्या राज्यातलं आहे, पण मागील सहा वर्षांपासून हे कुटुंब गुजरातमध्ये राहतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलीने असंही सांगितलं आहे की तिचा एक मित्र आहे त्याच्याशी मैत्री पसंत नव्हती म्हणून आई वडिलांनी मारहाण केली आणि वडिलांनी बलात्कार केला.
नेमकी घटना काय?
या मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १४ सप्टेंबरला ही मुलगी तिच्या एका मित्राशी फोनवर बोलत होती. मुलीला फोनवर बोलत असताना तिच्या आईने पाहिलं. ज्यानंतर आईने तू कुणाशी बोलत होतीस? अशी विचारणा केली. ज्यानंतर मुलीने मी आग्रा येथील मित्राशी बोलत असल्याचं सांगितलं. या मुलीचे वडील कामावर गेले होते, ते परतल्यानंतर मुलीच्या आईने मुलगी फोनवर आग्रा येथील मुलाशी बोलत होती असं त्यांना सांगितलं. ज्यानंतर वडिलांना खूप राग आला आणि त्यांनी तिला घरात कोंडलं. त्या रात्री तिला जेवणही दिलं गेलं नाही तसंच पाणीही दिलं गेलं नाही असा आरोप या मुलीने तिच्या तक्रारीत केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
२० ते २९ सप्टेंबर या कालावधीत बलात्कार आणि मारहाण
पुढे या मुलीने सांगितलं की मला मारहाण करून कोंडल्यानंतर वडिलांनी पुढच्या काही दिवसांत आईच्या देखत माझ्यावर वारंवार बलात्कार केला आणि माझा लैंगिक छळ केला. २० सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत वडिलांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केला आणि आई तेव्हा समोरच होती. तसंच आईने विवस्त्र अवस्थेत माझे फोटो काढले असंही या मुलीने तक्रारीत म्हटलं आहे.
१ ऑक्टोबरला काय घडलं?
या मुलीने तिच्या तक्रारीत असाही आरोप केला आहे की, आईने तिचे विविस्त्र फोटो काढले आणि मारहाणही केली. १ ऑक्टोबरला या मुलीचे वडील कामावर गेले त्यावेळी ही मुलगी कशीबशी घरातून बाहेर पडली आणि मावशीच्या घरी गेली. तिथून तिने पोलिसांना हेल्पलाईनवर संपर्क साधला. दोनवेळा तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशीही पोलिसांनी सुरु केली आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
