आईने महाग स्मार्ट फोन घेऊन दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिला महाग स्मार्ट फोन हवा होता. यावरुन तिचा तिच्या आईशी वाद होत होता. १५ वर्षांची ही मुलगी तिच्या आई आणि भावासह राहात होती. तर तिचे वडील या सगळ्यांपासून विभक्त राहात होते. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम या ठिकाणी ही घटना घडली आहे. या मुलीने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. या मुलीची आई रोजंदारीवर काम करते आणि तिला महागातला स्मार्ट फोन आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घेणं जमत नव्हतं. त्यामुळे आईचं आणि मुलीचं सतत भांडण होत होतं. रोजच्या वादांना कंटाळून या मुलीने आयुष्य संपवलं आहे.
गुरुवारी नेमकं काय घडलं?
१५ वर्षांची ही मुलगी आणि तिची आई यांचं गुरुवारीही भांडण झालं. स्मार्ट फोन घेऊन देणार नाहीस का? अशी विचारणा या मुलीने आईकडे केली होती. आईने फोन घेण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. या मुलीने घरातल्या एका खोलीमध्ये जात ते दार लावून घेतलं होतं. आधी घरातल्यांना वाटलं की तिने रागावून दार बंद केलं आहे. पण काही वेळाने तिचा कुठलाही आवाज येईना तसंच तिने दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे आईने आणि भावाने पाहिलं तर या मुलीने गळफास घेतला होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. ही विद्यार्थिनी नववीत शिकत होती. तिने तिच्या मैत्रिणींकडे स्मार्टफोन पाहिला होता आणि तसाच फोन आपल्याला हवा असा हट्ट धरला होता. पण घरातली परिस्थिती बेताची असल्याने आईला फोन घेणं शक्य नव्हतं. या मुलीचे वडील त्यांच्यापासून वेगळे राहतात. आई आणि त्यांच्यात मतभेद असल्याने घरातली सगळी जबाबदारी आईने घेतली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. आत्महत्या प्रकरणाची नोंद त्यांनी करुन घेतली आहे. या प्रकरणी आणखी काही घडलं होतं का? स्मार्टफोन चा हट्टच होता की आणखी काही कारण होतं याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ वर्षांची ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून आईकडे महागड्या स्मार्टफोनची मागणी करत होती. तिने तिच्या मैत्रिणींकडे स्मार्ट फोन पाहिला होता. तसाच आपल्यालाही हवा म्हणत या मुलीने आईकडे हट्ट धरला होता. पण घरातली परिस्थिती बेताची असल्याने आईने फोन घेऊन देण्यास नकार दिला. आईने तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. पण ही मुलगी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
