दिल्लीत १७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याचं भासवून या तिघांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. दक्षिण दिल्लीतल्या कालकाजी मंदिर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडिता १७ वर्षांची आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

काकाजी मंदिर परिसरात नेमकं काय घडलं?

१७ वर्षांची मुलगी तिच्या मित्रासह कालकाजी मंदिरात गेली होती. संध्याकाळी ७ च्या दरम्यान हे दोघंही मंदिरात होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तिघेजण तिथे आले, ते तिघंही पोलिसांच्या वेशात होते. या तिघांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून पीडितेला आणि तिच्या मित्राला मंदिर परिसरात असलेल्या पार्कमध्ये एकांतात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या तिघांनीही पोलीस असल्याचं भासवून पीडितेला आणि तिच्या मित्राला धमकावलं होतं असं पोलिसांनी म्हटलं आहे. सोमवारी म्हणजेच २१ सप्टेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?

पोलिसांनी सांगितलं की साधारण रात्री ८.४५ च्या सुमारास आम्हाला कालकाजी मंदिर परिसरातून सदर घटना घडल्यासंदर्भात फोन आला. ज्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं. पीडित मुलगी ही दिल्लीची रहिवासी आहे. तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेमअयात आलं. या प्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे तर एकाला अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.आम्ही मंदिराच्या आणि पार्कच्या आसपास असलेले सीसीटीव्ही तपासत आहोत. तसंच त्यावेळी जे लोक मंदिर आणि पार्कच्या परिसरात होते त्यांच्याकडूनही सदर आरोपींबाबत माहिती आम्ही घेत आहोत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

आसिफ नावाच्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी असंही सांगितलं की आम्ही यातल्या एका आरोपीला हटकलं तेव्हा त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला आम्ही शरण येण्यास सांगितलं तरीही त्याने हवेत तीन गोळ्या चालवल्या. ज्यानंतर आम्ही त्याच्या उजव्या पायावर गोळी चावली. त्यानंतर आऱोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव आसिफ आहे अशीही माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तो ओखला मंडी भागात काम करतो असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. आता आम्ही इतर दोन आरोपींचा शोध घेत आहोत असंही पोलीस म्हणाले. या प्रकरणी तिन्ही आरोपींच्या विरोधात POCSO कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.