पश्चिम बंगालमधील मलदा येथील एका १७ वर्षीय तरुणाचा दुर्देवी अंत झाला आहे. टिक टॉक व्हिडिओ काढण्याच्या नादात या तरुणाचा मृत्यू झाला. करीम शेख असं या तरुणाचं नाव असून टिक टॉक व्हिडिओ शूट करण्याच्या नादात गुदमरुन या तरुणाचा मृत्यू झाला.
देशात सध्या टिक टॉकचा बोलबाला आहे. टिकटॉकचा व्हिडिओ बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिकटॉकचे वेड लागले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच याचे वेड लागले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील करीमला टिक टॉकवर व्हिडिओ शूट करतानाच मृत्यू आला. झालं असं की करीम आणि त्याच्या मित्रांनी टिक टॉक व्हिडिओ काढण्यासाठी करीमला प्लॅस्टीकच्या पिशवीने एका इलेक्ट्रीक पोलला बांधले. दहा मिनिटांसाठी करीमला बांधून ठेवण्यात आलं होतं. मात्र अचानक त्याला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्याची अवस्था बघून त्याला मदत करण्याऐवजी त्याचे मित्र व्हिडिओ शूट करत राहिले. वेळीच मदत न मिळाल्याने करीमचा खांबाला बांधलेल्या अवस्थेतच दुर्देवी मृत्यू झाला. करीमचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
काही काळाने गावातील लोकांना शेतामधील खांबाला बांधलेल्या अवस्थेत करीम सापडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. करीम हा शेतमजुरी करायचा. त्याच्या निधनामुळे त्याच्या पालकांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
“करीम आणि त्याचे मित्र कायम मोबाईलवर असायचे. ते गेम खेळणं किंवा व्हिडिओ बनवणं एवढचं करायचे. या प्रकरणात आम्ही त्याच्या दोन मित्रांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे,” अशी माहिती करीमचे काका रेबुल इस्लाम यांनी दिली आहे. करीम बऱ्याचदा टिक टॉकवरच असायचा असं त्याच्या भावाने सांगितलं.
