सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपप्रकरणी तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याने स्थानिक न्यायालयात जामीन अर्ज केला असून सदर अर्जावरील सुनावणी बंद खोलीत (इन कॅमेरा) घेण्यात यावी, अशी त्याने विनंती केली आहे.
तेजपालच्या जामीन अर्जावरील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर तेजपालच्या वकिलांनी संबंधित अर्ज केला. तेजपाल याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचे काहीही जाबजबाब घेतले नाहीत, असा दावा करून तेजपाल याला जामीन मंजूर करावा, अशीही मागणी वकिलांनी केली आहे. त्यानंतर न्यायालयात सदर याचिकेवर युक्तिवाद झाला आणि त्यावर शुक्रवारी निर्णय देण्याचे न्यायालयाने जाहीर केले.
येथील एका हॉटेलात सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी ५० वर्षांचा तरुण तेजपाल याला गेल्या ३० नोव्हेंबर रोजी गोवा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी त्याच्यावर कलम ३५४ (अ) अन्वये आरोप ठेवण्यात आले. तरुण तेजपाल याला सध्या सडा येथील उपतुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची मुदत २३ डिसेंबपर्यंत वाढविली होती.