Tehran Airstrike Today: इराणची राजधानी तेहरानच्या नैऋत्येकडील एका शहरात निवासी इमारतीवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १३ जण ठार झाले, असे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. निमशासकीय फार्स वृत्तसंस्था आणि नूर न्यूजने इस्लामशायरजवळ झालेल्या हल्ल्याचे वृत्त दिले आहे. इस्रायलने हा हवाई हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. पण, इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला केला नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

तेहरानमध्ये हवाई हल्ला

‘डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असा थेट इशारा दिल्यानंतर हा हल्ला झाला आहे. पण, सोमवारी अमेरिका किंवा इस्रायलने हवाई हल्ला केला नसल्याचे दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे. पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तेहरानमधील शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीलाही लक्ष्य करण्यात आले असून, विद्यापीठाच्या जवळ असणाऱ्या नॅचरल गॅस वितरण व्यवस्थेवरही हल्ला केल्याचे इराणी माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

शरीफ विद्यापीठ

हवाई हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या कोणत्या भागाचे नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. शरीफ विद्यापीठावर अनेक देशांनी बंधने लादली आहेत. विद्यापीठ इराणच्या लष्काराच्या सूचनेनुसार काम करते शिवाय त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांना बळकटी देते असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. इस्लामशायरजवळील निवासी इमारतीला देखील लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अद्याप तोडगा नाही

अमेरिका – इस्रायलविरुद्ध इराण युद्धात अद्याप तोडगा निघालेला नाही. पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त या संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. दरम्यान, इराण अमेरिकेच्या शांतात प्रस्तावाच्या सशर्त मागण्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत इराणला मंगळवारपर्यंत मुभा दिली आहे. इराणने होर्मुझ खुली न केल्यास सर्व बेचिराख करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.