Tehseen Poonawalla House Arrest Claim: ई२० पेट्रोल धोरणाविरोधात आयोजित निषेध मार्च आणि उपोषणापूर्वी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा तहसीन पुनावाला यांनी केला आहे. पुनावाला इथेनॉल मिश्रित इंधनाविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही विरोध दर्शवला आहे. दरम्यान, शनिवारी घराबाहेर पोलिस उपस्थित असल्याचे अनेक व्हिडिओ पुनावाला यांनी प्रसिद्ध केले आहेत.

मूक निदर्शन आणि उपोषण करण्याची घोषणा

पुनावाला यांनी शुक्रवारी सरकारच्या ई२० पेट्रोल धोरणाविरोधात गांधी स्मृतीपर्यंत ‘एकट्याने’ चालत जाऊन मूक निदर्शने आणि उपोषण करण्याची घोषणा केली होती. ३१ जुलै रोजी संसदेच्या दिशेने काढल्या जाणाऱ्या ‘गाडी मार्च’ला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या महिनाभर चाललेल्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता; याच पार्श्वभूमीवर पुनावाला यांनी ई२० पेट्रोलबाबतच्या वाढत्या जनक्षोभाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुनावाला यांनी काय व्हिडीओ पोस्ट केला होता?

“महिला अधिकाऱ्यांसह दिल्ली पोलिसांची टीमने मला नजरकैदेत ठेवले आहे. नितीन गडकरी इथेनॉलच्या मुद्द्यावरुन घाबरले आहेत,” अशी पोस्ट पुनावाला यांनी एक्सवर केली आहे.

आणखी एक व्हिडीओ

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते कोणत्याही कागदपत्राशिवाय आपल्याला कसे काय डांबून ठेवले जाऊ शकते, असा सवाल एका पोलिस अधिकाऱ्याला विचारताना दिसत आहेत.

“कोणतेही कागदपत्र नाही, काही नाही. मी नजरकैदेत आहे… स्वातंत्र्यदिनाच्या १५ दिवस आधी तुम्ही मला डांबत आहात,” असे पुनावाला पोलिसांना सुनावताना ऐकू येत आहेत. यावर पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या निषेध मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत सहकार्य करण्याची विनंती केली.

प्रकरण काय?

सरकारच्या ई२० पेट्रोलच्या (८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉलचे मिश्रण) अंमलबजावणीवर विरोधी पक्ष आणि ग्राहक गटांकडून तीव्र टीका होत आहे. ई२० मुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे, असा आरोप अनेक वाहनधारकांनी केला आहे. नितीन गडकरी यांनी ई२० मुळे मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते, हे मान्य केले असले तरी या इंधनामुळे इंजिन बिघडल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुनावाला यांनी ‘आवाज की आजादीसाठी मार्च’ असे नाव देत आंदोलनाची घोषणा केली. पण, ते घराबाहेर पडण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या दाराशी धाव घेतली.