Tej Pratap sent to 14-day judicial custody: नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बिहार बंद आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी जनशक्ती जनता दल पक्षाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांना पाटणा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी पहाटे पाटणा न्यायालयाने हा निर्णय दिला. तेज प्रताप आंदोलनाच्या समर्थनार्थ गांधी मैदानाजवळ राम गुलाम चौकात सहभागी झाले होते, यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

तेज प्रताप यादव नौबतपूर पोलीस ठाण्यात होते. यानंतर त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. कोठडीच्या आदेशानंतर त्यांना बियूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. तेज प्रताप यादव यांच्या सुटकेसाठी सोमवारी नियमित जामीन अर्ज दाखल केला जाईल, असे त्यांचे वकील जगन्नाथ सिंह यांनी सांगितल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी शनिवारच्या बिहार बंद आंदोलनाला गांधी मैदान परिसरात हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान दगडफेक, तोडफोड आणि पोलिसांसोबत चकमकीच्या घटना उघडकीस आल्या.

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गांधी मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एफआयआरनुसार तेज प्रताप यादव यांच्याविरोधात दंगल घडवणे, पोलिसांवर हल्ला करणे, पोलिसांच्या वाहनाचे नुकसान करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडण्यापासून रोखणे आणि पोलीस अधिकाऱ्याला दुखापत करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, यादव यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ चा देखील एफआयआरमध्ये समावेश असल्याचे वकील सिंह म्हणाले.

दोनदा ताब्यात घेतल्यानंतर अटक

तेज प्रताप यादव माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद आणि राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बिहार बंद आंदोलनात गांधी मैदानाजवळ राम गुलाम चौकात यादव सहभागी झाले होते. आंदोलनस्थळावरुन यादव यांना ताब्यात घेण्यात आले. काही तासांनी त्यांची सुटका करण्यात आली मात्र, पुन्हा पाटण्याच्या सिटी सेंटर मॉलमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.