बिहारच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाले, तर नितीश कुमार हे राज्यसभेवर गेले आहेत. तसेच नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांची मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
दरम्यान, बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी बिहारमधील सरकारबाबत एक खळबळजनक दावा केला आहे.
“बिहारमधील सरकार लवकरच कोसळणार आहे”, असा दावा तेज प्रताप यादव यांनी केला आहे. या संदर्भात तेज प्रताप यादव यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
तेज प्रताप यादव यांनी काय म्हटलं?
“बिहारमधील सरकार लवकरच कोसळणार आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना ‘सम्राट’ असं म्हणून फटकारलं आहे. मी तुम्हाला हे आधीच सांगितलं होतं आणि याबाबत भाकीत देखील केलं होतं. मी सध्या वृंदावनमध्ये आहे. आता हे देखील सांगतो की बिहारमधील सरकार लवकरच बदलेल”, असा दावा तेज प्रताप यादव यांनी केला आहे.
तेज प्रताप यादव कोण आहेत?
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे तेज प्रताप यादव हे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. लालू प्रसाद यादव यांनी काही महिन्यांपूर्वीच तेज प्रताप यादव यांची राष्ट्रीय जनता दलामधून हकालपट्टी केलेली आहे. एवढंच नाही तर कुटुंबातूनही त्यांना बेदखल करण्यात आल्याचं लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं होतं.
३७ वर्षीय तेज प्रताप यादव हे तेजस्वी यादव यांचे भाऊ आहेत. तेज प्रताप यादव यांनी बिहारचं मंत्रिपदही भुषविलेलं आहे. आता तेज प्रताप यादव यांनी स्वत:चा जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन केलेला आहे. तसेच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तेज प्रताप यादव यांचा पराभव झाला होता.
