राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव तीन वर्षांनंतर बिहारची राजधानी पटना इथं गेले. या दरम्यान, बराच गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे. लालू यांचा मुलगा तेजप्रताप यादव संतापल्याने त्यांनी घराबाहेरच धरणे आंदोलन केलं.

लालू यादव हे रविवारी संध्याकाळी पटना इथं पोहोचले. विमानतळावर त्यांचं स्वागत करायला त्यांचे चिरंजीव तेजप्रताप यादवही गेले होते. मात्र, त्यांनी असा आरोप केला आहे की त्यांना आपल्या वडिलांना भेटू दिलं नाही. या सगळ्यासाठी तेजप्रताप यादव यांनी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, सुनील कुमार सिंह आणि तेजस्वी यादवांचे राजकीय सल्लागार संजय यादव यांनी जबाबदार धरलं आहे. तेजप्रताप यांची इच्छा होती की लालू यांनी प्रथम त्यांच्या घरी थोड्या वेळासाठी यावं आणि त्यानंतर राबडी देवी यांच्या घरी जावं.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळावरुन निघाल्यानंतर लालू थेट राबडी देवी यांच्या घरी गेले. यानंतर तेजप्रताप यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी आपल्या घराबाहेरच आंदोलन केलं. तेजप्रताप यांनी सांगितलं की जोपर्यंत वडील आपल्याला भेटायला येणार नाहीत तोवर आंदोलन संपवणार नाही. यादरम्यान तेजप्रताप यांनी लालू आणि राबडी यांच्याशी फोनवर बातचितही केली.

तेजप्रताप यांच्या आंदोलनानंतर लालू आणि राबडी देवी हे दोघेही तेजप्रताप यांच्या घरी गेले. तिथे तेजप्रताप यांनी लालू यांचे पाय धुतले. त्यानंतर लालू आपल्या घरी परतले. लालू आणि राबडी देवी यांच्या येण्याने तेजप्रताप यांचा राग शांत झाला आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं.