Dubai Airshow Tejas Jet Crash Update: दुबई येथे सुरू असलेल्या एअर शो दरम्यान भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस कोसळल्यानंतर वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर हवाई दलाने एक निवेदन जारी केले आहे.

हवाई दलाच्या एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात म्हटले, “एअर शोदरम्यान तेजसचा अपघात झाला. यात वैमानिक गंभीर जखमी झाला होता. ज्यात त्याचा मृत्यू झाला. सदर जीवितहानीबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. शोकाकुल कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो.”

याचबरोबर अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१० वाजता तेजस विमान कोसळले. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तेजस विमान वेगाने जमिनीच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. जमिनीवर कोसळल्यानंतर विमानातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. जमिनीवर धडक होण्यापूर्वी वैमानिकाला बाहेर पडता आले नसल्याचे दिसते.

व्हायरल व्हिडीओ अपघाताची भीषणता दिसून येत आहे. आकाशातून वेगात येणारे तेजस जमिनीवर कोसळल्यानंतर लगेचच आगीचा गोळा आणि त्यानंतर काळा धूर वर आल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातानंतर एअर शो पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघात होण्यापूर्वी वैमानिक सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला की नाही, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.

तेजस विमानाची वैशिष्ट्ये काय?

जगातील सर्वात लहान लढाऊ विमान म्हणून तेजस विमानाची ओळख आहे. १९८३ ला या लढाऊ विमानाच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला विविध कारणांनी खूप विलंब होत गेला. जानेवारी २००१ मध्ये विमानाने पहिल्यांदा आकाशात झेप घेतली. विविध प्रकारच्या तेजसची निर्मिती करत, सुधारणा करत, चाचण्या करत अखेर २०१५ मध्ये नव्या आवृत्तीचे तेजस १ (Tejas 1) लढाऊ विमान भारतीय वायू दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले. सध्या ३० ‘तेजस १’ वायू दलात कार्यरत आहेत. तर तेजस ‘एमके १ए’ ही तेजसची नवी आवृत्ती, काहीसे आणखी आधुनिक तेजस तयार करण्यात आले असून त्याचे उत्पादन सुरु आहे.