Tejashwi Yadav Comment: नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राजद महाआघाडीचा भाजपा-जदयू आघाडीने दणदणीत पराभव केला. यानंतर आज नितीश कुमार यांनी सलग पाचव्यांदा आणि एकूण दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजदच्या पराभवानंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेली तेजस्वी यादव शांत होते. निकालानंतर यादव परिवारातही फूट पडल्याचे चित्र दिसले. यानंतर तेजस्वी यादव यांची पहिलीच जाहिर प्रतिक्रिया समोर आली आहे.

एनडीएच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी नितीश कुमार आणि इतर मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

तेजस्वी यादव म्हणाले, “आदरणीय नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांनाही शुभेच्छा. नवे सरकार जबाबदारीने काम करत बिहारच्या आशा आणि आकांक्षांना वास्तवात उतरविण्यासाठी तसेच बिहारी जनतेच्या जीवनात सकारात्मक आणि गुणात्मक परिवर्तन आणेल, अशी आशा करतो.”

दोन दशकांपासून नितीश कुमार यांचे बिहारवर एकछत्री अंमल राहिल्याचे दिसते. त्यांनी आजवर दहावेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे.

नितीश कुमार यांच्यासह भाजपाचे नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरूवारी (२० नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

बिहारच्या पराभवानंतर राजदने काय म्हटले?

शुक्रवारी निकाल लागल्यानंतर शनिवारी राष्ट्रीय जनता दलाने अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट शेअर करून पराभवानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “निवडणुकीत चढउतार येतच असतात. पण पक्ष गरीबांचा आवाच उचलत राहिल”, अशी पोस्ट पक्षाच्या हँडलवर करण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. २०२० साली राजदने ७५ जागांवर विजय मिळवला होता. तर यावेळी राजदला केवळ २५ विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला. तर राजदचा मित्र पक्ष काँग्रेसला केवळ सहा मतदारसंघात विजय मिळवता आला.