पाटणा : राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची रविवारी निवड करण्यात आली. यामुळे लालूप्रसाद यादव यांचा वारसदार म्हणून ३६ वर्षीय तेजस्वी यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तेजस्वी बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लालूप्रसाद यांच्या संमतीने तेजस्वी यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस अब्दुल बारी सिद्दीकी यांनी नमूद केले. राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांना प्रकृतीच्या कारणास्तव पक्षविस्तारासाठी दौरे करण्यात अडचणी असल्याचे सिद्दीकी यांनी नमूद केले. आता राज्यात तसेच राज्याबाहेर पक्षविस्ताराची जबाबदारी तेजस्वी यांच्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
लालू कन्येची नाराजी
तेजस्वी यांच्या भगिनी रोहिणी आचार्य यांनी या निवडीनंतर टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय जनता हा घुसखोरांच्या हाती गेला असून, लालूवाद उद्ध्वस्त करणे हेच या व्यक्तींचे एकमेव उद्दिष्ट आहे अशी टीका त्यांनी केली. समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेत त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पक्षात ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला रोहिणी यांनी दिला. बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊनदेखील तेजस्वी यांना पद बहाल करण्यात आले. ही घराणेशाही असल्याची टीका भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली.
