Tejashwi Yadav on Bihar Election 2025 Exit Polls : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीच्या निकालाबाबतचे संभाव्य अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या माध्यमांनी व तटस्थ संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलद्वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळेल. तर राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसप्रणित महागठबंधनचा दारुण पराभव होईल.
दरम्यान, या एक्झिट पोलवर राजदचे प्रमुख नेते व महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यादव यांनी ही आकडेवारी बोगस असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालय व अमित शाहांनी लिहून दिलेली आकडेवारी एक्झिट पोलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.
वृत्तवाहिन्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेली स्क्रिप्ट वाचतात : तेजस्वी यादव
तेजस्वी यादव म्हणाले, “पंतप्रधान कार्यालयातून जे लिहून येतं, अमित शाह जे लिहून देतात तेच प्रसारमाध्यमं दाखवतात. अमित शाह अमुक वृत्तवाहिनीला तमुक आकडेवारी जाहीर करायला सांगतात, मग ती वृत्तवाहिनी तेच आकडे दाखवते.
तेजस्वी यादव यांनी मांडलं ७२ लाख मतांचं वेगळं गणित
“आपण या निवडणुकीवेळी झालेलं मतदान आणि २०२० मध्ये झालेलं मतदान पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ७२ लाख मतं वाढली आहेत. या ७२ लाख मतांचं आपण २४३ मतदारसंघांमध्ये वाटप केल्यास प्रत्येक मतदारसंघात सरासरी २९,५०० अधिक मतं पडल्याचं तुमच्या लक्षात येईल. एवढी मतं प्रत्येक मतदारसंघाचा निकाल बदलण्यास पुरेशी आहेत. या ७२ लाख लोकांनी नितीश कुमार यांचं सरकार वाचवण्यासाठी मतदान केलेलं नाही. त्यांनी बिहारच्या विकासासाठी, बिहारच्या परिवर्तनासाठी मतदान केलं आहे.”
“नवमतदारांनी नितीश कुमार यांची सत्ता उलथवण्यासाठी मतदान केलं”
तेजस्वी यादव म्हणाले, “७२ लाख नवमतदारांनी सरकार बदलण्यासाठी, व्होट फॉर चेंजसाठी मतदान केलं आहे. संपूर्ण बिहारमध्ये सरकार बदलतंय. ७२ लाख लोकांनी नितीश कुमार यांना हटवण्यासाठी व बिहारमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदन केलं आहे.”
