महिला सहकारी पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तेजपालचे कुटुंबीय संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्हीचे चित्रीकरण दिल्लीत सर्वाना दाखवीत असल्याची तक्रार फिर्यादी पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयाकडे बुधवारी करण्यात आली.
सदर चित्रीकरण हॉटेलच्या उदवाहनाबाहेरचे असल्याचा दावा करून त्याच्या आधारे खटला उभा राहू शकत नाही, असा युक्तिवाद तेजपालचे वकील अमित देसाई यांनी या वेळी केला. सदर चित्रीकरणाची फीत तेजपालला उपलब्ध करण्यात आली आणि त्याच फितीचा भाग त्याच्या कुटुंबीयांतर्फे दिल्लीत सर्वाना दाखविला जात असल्याची तक्रार करून राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने अ‍ॅड. सुरेश लोटलीकर यांनी तेजपालच्या जामिनास विरोध केला. तेजपालला जामीन मंजूर करण्यात आला तर तो खटल्याच्या कामकाजात अडथळे आणून साक्षीदारांना फितविण्याची शक्यता आहे. तेजपालला सोडण्यात आल्यास त्याच्याकडून शिस्तबद्ध वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असेही लोटलीकर यांनी सांगितले.
या सर्व प्रकारांमुळे संबंधित महिला अतिशय तणावग्रस्त झाली असून तिच्या चारित्र्यहननाचे संदेश दिल्लीभर फिरत असल्याची बाब तिने उघड केली असल्याची बाब लोटलीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
 तेजपाल हा सध्या सडा येथील उपकारागृहात आहे.