Telangana Adilabad Hospital Fire: तेलंगणातील आदिलाबाद येथील सरकारी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाच्या नवजात शिशू विशेष विभागामध्ये सोमवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन अकाली जन्मलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर सुमारे २८ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बाळांना वाचवताना दोन नर्ससह काही रुग्णालय कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर एका वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. एम. फासिल यांच्या केवळ पाच दिवसांच्या मुलीने या दुर्घटनेत प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेबाबत सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

‘आता पत्नीला काय सांगू?’

फासिल सोमवारी रात्री आपल्या मुलीला भेटण्यासाठी नवजात शिशू विशेष विभागामध्ये गेले होते. डॉक्टरांनी त्यांना काही मिनिटांसाठी बाळाला पाहण्याची परवानगी दिली होती. “मी पाच-सहा मिनिटे तिथे होतो, मुलीला पाहिलं आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करून बाहेर आलो,” असे फासिल यांनी सांगितले. मात्र, काही वेळातच मोठा स्फोट झाला. त्यानंतर नवजात शिशू विभागामध्ये आग आणि धुराचे लोट पसरले. फासिल यांची पाच दिवसांची मुलगी त्यात अडकली आणि तिचा मृत्यू झाला.

“आता ती मरण पावली आहे. वेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या माझ्या पत्नी सबाला मी काय सांगू? यासाठी जबाबदार कोण आहे? माझ्या मुलीला परत कोण आणणार?” असा सवाल फासिल यांनी केला. त्यांचा भाऊ त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता.

तीनही बाळांचा अकाली जन्म

फासिल यांची मुलगी १८ सप्टेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात जन्मली होती. तिचे वजन अवघे एक किलो होते. अकाली जन्म झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आग लागल्यानंतर सुमारे तासाभराने, रात्री साडेबारा वाजता तिचा मृत्यू झाला.

इचोडा येथील शेख बाई यांच्या १५ दिवसांच्या मुलीचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिचे वजन सुमारे दीड किलो होते. गेल्या आठवड्यात तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

तिसरे बालक उत्नूर

तिसरे बाळ उत्नूर येथील सबा समरीन यांची मुलगी होती. तिचा जन्म रविवारीच झाला होता आणि तिचे वजनही सुमारे दीड किलो होते. आगीतून तिला बाहेर काढल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला निझामाबादच्या सरकारी रुग्णालयात नेले, मात्र सकाळी सव्वासहा वाजता तिचा मृत्यू झाला

‘एसीच्या स्फोटानंतर काही क्षणांत आग पसरली’

फासिल यांच्या म्हणण्यानुसार, पहिला स्फोट ऐकल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका युनिटमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले. मात्र, अनेक एसी युनिट्समध्ये स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरल्याचे त्यांनी सांगितले.

आग लागल्यानंतर नवजात शिशू विभागामध्ये मोठ्या प्रमाणात धूर भरला. डॉक्टर आणि नर्स सुरुवातीला बाहेर आले, मात्र आत नवजात बालके असल्याचे लक्षात येताच त्यांनी बालकांना वाचवण्यासाठी पुन्हा आत धाव घेतली. एक दरवाजा लॉक झाल्याने खिडक्या आणि काचेच्या तावदानांना फोडून बालकांना बाहेर काढावे लागले. त्यावेळी काही बालके धुरामुळे श्वास घेण्यासाठी धडपडत होती, तर काही रडत होती, अशी माहिती एका नातेवाईकाने दिली.

नवजात शिशू विशेष विभागामधील एसी युनिटचा स्फोट होऊन आग लागल्यानंतर रुग्णालयाबाहेरील गर्दी

२८ बालकांना वाचवले, काहींना श्वसनाचा त्रास

रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. या दुर्घटनेत सुमारे २८ बाळांना वाचवण्यात आले. मात्र, धुरामुळे काही बाळांना नंतर श्वसनाचा त्रास जाणवला. काही बाळांना आदिलाबादमधील खासगी रुग्णालयात, तर काहींना पुढील उपचारांसाठी निझामाबादला हलवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी बालकांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याबरोबरच त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या कडक सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा आणि अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून या भीषण आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एसी युनिटमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडली की शॉर्टसर्किटमुळे, याबाबत तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.