Telangana Hospital Fire : तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागाला सोमवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर २८ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. दरम्यान, बालकांचे प्राण वाचविताना नर्ससह रुग्णालयातील इतर कर्मचारी भाजल्याने जखमी झाले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

एसी युनिटचा स्फोट झाल्याचा संशय

रात्री साडेअकरा वाजता नवजात शिशू विशेष विभागामध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एसी युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर आग भडकली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे; मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण वॉर्डमध्ये दाट धूर पसरला. इन्क्युबेटरमध्ये असलेल्या बालकांना बाहेर काढण्यासाठी पालक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वॉर्डच्या काचा फोडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली. या आगीत नवजात शिशू विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

तीन बालकांचा मृत्यू

भीषण आगीच्या या दुर्घटनेत तीन निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये अवघ्या पाच दिवसांच्या एका नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला; तर दुसऱ्या बालकाने सोमवारी रात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी तिसऱ्या बालकाने धुरामुळे झालेल्या श्वसनाच्या त्रासामुळे प्राण गमावले. पीडित कुटुंबीय हे इच्चोडा, इंद्रावेली, तसेच उत्नूर परिसरातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धुरामुळे अनेक बालकांना श्वसनाचा त्रास

आगीतून सुमारे २८ बालकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यापैकी काही बालकांना धुराचा त्रास झाल्याने श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या. आरोग्यमंत्री दामोदर राजा नरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बालकांना आदिलाबादमधील खासगी रुग्णालयात, तर आणखी दोन बालकांना पुढील उपचारांसाठी निजामाबाद येथे हलवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि सुरक्षा लेखापरीक्षणाचे आदेश

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी बालकांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याबरोबरच त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या कडक सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा आणि अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून या भीषण आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एसी युनिटमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडली की शॉर्टसर्किटमुळे, याबाबत तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.