तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘बी टीम’ असून ते काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगत जनतेने काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील चार पक्षाच्या आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आम्ही संसदेत भूमी अधिग्रहण विधेयकावर लढत होतो. तेव्हा टीआरएस भाजपाला मदत करत होती. टीआरएसच्या प्रत्येक आमदाराने आरएसएस आणि मोदींना मदत केली आहे. टीआरएस, तेलंगणा राष्ट्र समिती नाही तर तेलंगणा राष्ट्र संघ परिवार आहे. ही संघाची ‘बी टीम’ आहे. काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर भाजपाला हटवू नये हेच टीआरएसचे लक्ष्य आहे.

जेव्हा तेलंगणा राज्य स्थापन झाले. तेव्हा त्यांच्याकडे १७ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद होती. आता चार वर्षांत टीआरएसने राज्यावर २ लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या नावाने २ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर प्रत्येक नागरिकावर ६० हजार रुपयांचे कर्ज आहे. या चार वर्षांत राव यांचे उत्पन्न ४०० टक्क्यांनी वाढले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.