Telangana C Section Surgery ICU Probe : तेलंगणामधील कामारेड्डी जिल्ह्यातील बांसवाडा येथील एरिया रुग्णालयात ९ आणि १० जुलै रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या १० पैकी ५ मातांना शस्त्रक्रियेनंतर त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना विशेष उपचारांसाठी शासकीय सामान्य रुग्णालय, निझामाबाद आणि नंतर हैदराबाद येथील निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये हलवण्यात आलं. राज्य सरकारने या गुंतागुंतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बांसवाडाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कामारेड्डीचे प्रभारी जिल्हा आरोग्य सेवा समन्वयक डॉ. एम. विजय भास्कर यांनी सांगितलं की, ९ आणि १० जुलै रोजी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण १० सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. ९ जुलै रोजी रात्री उशिरा एका रुग्णाचा रक्तदाब कमी झाल्यामुळे तिला निझामाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. १० जुलै रोजी संध्याकाळी दुसऱ्या एका महिलेने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यावर तिलाही निझामाबाद रुग्णालयात पाठवण्यात आलं. ११ जुलै रोजी आणखी तीन महिलांना त्रास होऊ लागल्याने त्यांनाही दुसऱ्या रुग्णालयात पाठवावं लागलं. “जरी लक्षणं वेगवेगळी असली, तरी यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न असण्याची शक्यता आम्हाला वाटली आणि आम्ही सविस्तर आढावा सुरू केला”, असं भास्कर यांनी सांगितलं.

किडनीशी संबंधित समस्या

त्रास झालेल्या महिलांपैकी तिघींना लघवी कमी होत असल्यामुळे डायलिसिससाठी हैदराबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. त्यांना किडनीसंदर्भातील त्रास जाणवला. या तिघींपैकी दोघांच्या प्रकृतीत उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या किडनीच्या कार्यात सुधारणा झाली आहे आणि त्यांचे डायलिसिस थांबवण्यात आले आहे. “एका महिलेला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे, तर इतर दोघी अजूनही मेडिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आहेत”, असं भास्कर यांनी बुधवारी सांगितलं.

बांसवाडा येथे सिझेरियन झालेल्या इतर पाच महिलांना कोणताही त्रास झालेला नाही. एकूण १० मातांपैकी सात जणींना टाके काढल्यानंतर आधीच डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती भास्कर यांनी दिली.

औषधांची तपासणी सुरू

दरम्यान, राज्य सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती महिलांना देण्यात आलेल्या सलाईन व इतर द्रव पदार्थांची तपासणी करत आहे. “आयव्हीसह सर्व द्रव पदार्थ निर्जंतुक असल्याचं सिद्ध झालं आहे. आम्ही आता महिलांना दिलेल्या औषधांची औषधशास्त्रीय तपासणी करत आहोत”, असं भास्कर यांनी सांगितलं. तसंच यामध्ये संसर्गाची शक्यता कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “महिलांना हा त्रास कशामुळे झाला, याबाबत आम्ही अजून खात्रीशीर सांगू शकत नाही. कारण शोधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत”, असं भास्कर पुढे म्हणाले.

राजकीय वादंगदरम्यान, हा मुद्दा तेलंगणामध्ये राजकीयदृष्ट्या तापला असून, विरोधकांनी याला चुकीच्या शस्त्रक्रिया म्हणत कारवाईची मागणी केली आहे. बीआरएस नेते टी. हरीश राव यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “आम्ही बाधित कुटुंबांना भरपाई देण्याची मागणी करतो आणि सरकारने पीडितांना पूर्णपणे बरं होईपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली पाहिजे.”

राजस्थानच्या काही भागांत नवमातांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ही घटना समोर आली आहे. राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन महिन्यांत सिझेरियन झालेल्या अनेक महिलांना किडनीशी संबंधित समस्या उद्भवल्या आहेत. मे महिन्यात कोट्यामध्ये पाच नवमातांचा मृत्यू झाल्यानंतर आणि इतर अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हे संकट उघडकीस आलं होतं.