तिरुपती मंदिरातील वेंकटेश्वराच्या चरणी तब्बल साडेपाच कोटींचे दागिने अर्पण केल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी चंद्रशेखर राव यांनी तिरुपतीच्या मंदिरात नवस बोलला होता. हा नवस पूर्ण झाल्यामुळे राव यांनी मंगळवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन वेंकटेश्वराच्या चरणी दागिने अर्पण केले. मात्र, यामुळे चंद्रशेखर राव करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

kcr-tirupati-759-3

चंद्रशेखर राव काल संध्याकाळी विशेष विमानाने त्यांची पत्नी आणि मंत्रिमंडळाचा लवाजमा घेऊन तिरुपती मंदिरात गेले होते. जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी पहिल्यांदाच तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे. राव यांनी वेंकटेश्वराला अर्पण केलेल्या दागिन्यांच्या यादीत शालिग्राम हार आणि मखर कंठाभरणम या बहुपदरी हाराचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांचे वजन तब्बल १९ किलो इतके आहे. या सगळ्या अलंकारांची किंमत तब्बल पाच कोटी असल्याची माहिती तिरुपती मंदिराचे कार्यकारी अधिकारी डी. सांबशिव यांनी दिली.

यापूर्वीही चंद्रशेखर राव यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली कडेकोट सुरक्षाव्यवस्था अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती. हैदराबादच्या बेगमपेठ येथे तब्बल एक लाख चौरस फुटांवर राव यांचा भक्कम तटबंदी असलेला राजप्रासाद बांधण्यात आला होता. या घरात राव यांच्यासाठी बुलेटप्रुफ बाथरूमही उभारण्यात आले होते. याशिवाय, घराच्या सर्व खिडक्या व व्हेंटिलेटर्स यांच्यावर बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. राज्याच्या सुरक्षा यंत्रणांकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार ही व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीची कसून झडती घेतली जाणार असून त्यांना मोबाईल फोन्स, घड्याळ आणि धातूच्या अन्य वस्तू बाहेरच ठेवाव्या लागणार आहेत. या सगळ्यासाठी काही लाख रूपयांची रक्कम खर्ची पडली होती. मात्र, तेलंगण पोलिसांकडून राव यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे समर्थन करण्यात आले होते.

kcr-tirupati-759-4