देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. यासाठी विरोधकांकडून भाजपाविरोधात मोर्चेबांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बुधवारी बिहार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. भेटीनंतर चंद्रशेखर राव, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याबाबात तुम्ही बोलत आहात. भाजपाजवळ पंतप्रधान मोदींचा चेहरा आहे. जर, तेव्हा परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही नितीश कुमारांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवणार का? असा सवाल माध्यमांनी चंद्रशेखर राव यांना विचारला. त्यावर हा निर्णय विरोधीपक्ष मिळून ठरवला जाईल, असे उत्तर राव यांनी दिलं आहे.

मात्र, या उत्तरानंतर नितीश कुमार जागेवरुन उठले आणि त्यांनी राव यांना जाण्याबाबत विनंती केली. तेव्हा राव यांनी नितीश कुमार यांचा हात पकडला आणि बसवण्यासाठी सांगितलं. पण, नितीश कुमार उभे राहिले आणि राव यांना जाण्याबद्दल बोलू लागले. या माध्यमांच्या भानगडीत पडू नका, असेही नितीश कुमार चंद्रशेखर राव यांना म्हणाले.

राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार?

यानंतर, तुम्ही सर्वजण स्मार्ट आहात पण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे, असे चंद्रशेखर राव यांनी माध्यमांना म्हटलं. या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल? राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?, असा सवाल माध्यम प्रतिनिधीने विचारला. पण, नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राव यांनी उठून जाण्याचे आवाहनं केलं. त्यावर भाजपाविरोधातील सर्व पक्षांशी चर्चा करुन पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेऊ, असे राव यांनी म्हटलं. तर, तुम्ही खूप चांगली बाब मांडली, असे नितीश कुमार यांनी सांगितलं. मात्र, सुरू असलेल्या या प्रकारावर उपस्थित असलेले सर्वजण हसत होते. तर, नितीश कुमार यांनी चंद्रशेखर राव यांचा अपमान केला, असा आरोप भाजपाने ट्विट करत केला आहे.