Telangana Chief Minister A Revanth Reddy: ‘महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने जवळपास ९० टक्के जागांवर विजय मिळवला आहे. आम्हाला या निवडणुकीत मिळालेले यश हे आणखी काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन देईल’, अशी प्रतिक्रिया तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी रविवारी दिली. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती समारंभाला संबोधित करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

निवडणुकीतील पराभव किंवा विजयाचा आमच्या कामावर फारसा परिणाम होत नाही. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही आमचे काम सुरूच ठेवतो, आणि विजय मिळाला तरी आम्ही हुरळून जात नाही. आम्ही नेहमीच निवडणुका लढतो आणि लोकांसाठी अथकपणे काम करत राहतो, असेही रेड्डी यांनी सांगितले.

पुढील २० वर्षे सक्रिय राहणार

रेवंता रेड्डी म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. “विरोधी पक्षाचे नेते काँग्रेसचा हा विजय पचवू शकत नाहीत. त्यांना राजकारणातील हे वास्तव स्वीकारायचेही नाही,” असे रेड्डी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी पुढील २० वर्षे सक्रिय राहून लोकांची सेवा करेन. मी कधीही शासक म्हणून वागलो नाही, तर लोकांचा सेवक म्हणूनच वागलो आहे.”

“नेने राजू, नेने मंत्री” या त्यांच्या विधानावरून विरोधकांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून असलेल्या त्यांच्या पदासोबतच महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास (एमए अँड यूडी) या खात्यांची जबाबदारीही स्वीकारली होती. त्या संदर्भातच त्यांनी ही टिप्पणी केली होती.

लंबाडा समाजाचे आभार

ए. रेवंता रेड्डी यांनी त्यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लंबाडा समाजाचे आभार मानले. झेडपीटीसी सदस्यापासून राज्याचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात या समाजाने दिलेल्या पाठिंब्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, संत सेवालाल महाराजांचा भव्य पुतळा नल्लामला जंगलात उभारण्यात येईल आणि त्यांचा पुढील वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. सर्व वास्तू आदिवासी परंपरांचे काटेकोर पालन करून बांधल्या जातील. “संत सेवालाल महाराजांनी सर्वांना मानवतेच्या आणि शांततेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आणि देशातील १५ कोटी लंबाडा समाजासाठी मार्गदर्शक म्हणून उभे राहिले,” असे त्यांनी सांगितले.

“सेवालाल जयंती अधिकृतपणे साजरी करणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी नमूद केले की तेलंगणा चळवळीत लंबाडा समाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून सुरेश नायक आणि कविता नायक यांनी या चळवळीत आपले बलिदान दिले. मुख्यमंत्री रेड्डी यांनी यावर भर दिला की दलितांसह आदिवासींना त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्राधान्य आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे.