Telangana CM Revanth Reddy Sacks Konda Surekha: तेलंगणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कोंडा सुरेखा यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांवर जाहीरपणे टीका करत परकाल विधानसभा जागेवर स्वतःचा दावा सांगितला. या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद यामुळे अधिकच चिघळला आहे. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी कोंडा सुरखा यांना मंत्रिमंडळातूनच हटविण्याचा निर्णय घेतला असून, राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांना याबाबत कळविण्यात आले आहे.

मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर कोंडा सुरेखा काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी जबरदस्तीने ही कारवाई केल्याचा आरोप कोंडा सुरेखा यांनी केला आहे. तसेच, त्यांचा पक्षांतर करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका आणि अपशब्द वापरण्यात आले आहेत पण, तेव्हा कारवाई करण्यात आली नाही ते सर्व आजही पदावर आहेत, असेही कोंडा सुरेखा या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. “रेवंथ रेड्डी यांनी जबरदस्तीने मला पदावरुन हटवले आहे. माझा पक्षांतर करण्याचा कोणताही विचार नाही”, असे सुरेखा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. राज्य सरकारकडून देखील समस्यांचा सामना करावा लागल्याचा आरोप कोंडा सुरेखा यांनी केला.

…तर काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही, कोंडा सुरेखांचा इशारा

सगळे मला पाठिंबा देतील. ते देखील समाधानी नाहीत. पण कोणीही ते उघडपणे बोलत नाही. जे ते बोलू शकले नाहीत ते माझी मुलगी बोलली, सर्वांना पटते पण सरकार त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते आणि मंत्र्यांचे ऐकून घेतले, त्यांच्या समस्या सोडवल्या, तरच ते न्हा सत्तेत येतील अन्यथा येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया कोंडा सुरेखा यांनी या कारवाईनंतर दिली.

का केली कारवाई?

तर, काँग्रेस पक्षात कोंडा सुरेक्षा यांच्याविरोधात काही वाद प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार मल्लू रवी यांनी दिले. “वरिष्ठांनी परवानगी दिल्यानंतरच ही कारवाई करण्यात आलीय, त्यांची वक्तव्य काँग्रेस पक्ष आणि सरकारची प्रतिमा खराब करत आहेत”, असेही रवी पुढे म्हणाले.

नेमका वाद काय?

दरम्यान, हा सगळा वाद पारकल या विधानसभा मतदारसंघाशी निगडीत आहे. कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिता पटेल यांनी या मतदारसंघावर दावा करत मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रेड्डी यांनी घेतलेल्या सार्वजनिक बैठकीत विद्यमान आमदार रेवुरी प्रकाश रेड्डी यांच्या समर्थनात भाष्य करत त्यांना पुन्हा निवडून आणण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावरुनच कोंडा सुरेखा यांच्या कन्या दुखावल्या आणि त्यांनी रेड्डी यांच्यावर टीका केली.

काय म्हणाल्या होत्या सुष्मिता?

तुम्ही आमच्या भागात का येता? कोंडांच्या भागात, आणि लोकांना प्रकाश रेड्डी यांना पुन्हा निवडून देण्याची विनंती करता, असे सवाल कोंडा सुष्मिता पटेल यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना केला. दरम्यान, सुष्मिता यांनी स्वत: या जागेवर दावा सांगितला असून, परकाल मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय सिष्मितांनी सरकार २०० कोटी जमीन घोटाळ्यात आणि शेल कंपनीच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला.