CM Revanth Reddy Remarks on Hindu Gods: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी हैदराबाद येथील गांधी भवनात काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करत असताना हिंदू देव-देवतांबद्दल भाष्य केले. या विधानामुळे तेलंगणातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना विनोदाच्या स्वरुपात केलेल्या मांडणीवर भाजपाने आक्षेप घेतला असून राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रेवंत रेड्डी यांनी पक्षाच्या विविधतेवर प्रकाश टाकताना हिंदू धर्माशी तुलना केली. त्यांनी म्हटले, काँग्रेस पक्ष सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन चालतो. जसे की, हिंदू धर्मात कुणी भगवान व्येंकटेश्वरची पूजा करतो, कुणी हनुमानाची भक्ती करतो. आपण देव-देवतांच्या बाबतीतही विभागले गेलेलो आहेत.
प्रत्येकाचा देव वेगळा
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पुढे म्हणाले, “हिंदू धर्मात किती देव आहेत? तीन कोटी? असे का? जे लोक अविवाहित आहेत, ते हनुमानाची भक्ती करतात. ज्यांनी दोन लग्न केली, त्यांचा देव वेगळा आहे. जे मद्य पितात त्यांचा देव निराळाच. येलम्मा, पोचम्मा, मैसम्मा हेही देव आहेत. जे चिकन-मटण खातात, त्यांचा देवही वेगळा आहे. जे डाळ-भात खातात, त्यांचा देव भलताच आहे. बरोबर ना? आपल्याकडे सर्व प्रकारचे देव आहेत.”
भाजपाकडून जोरदार टीका
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी. रामचंद्र राव यांनी रेवंत रेड्डी यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हिंदूंच्या भावनांचा अपमान झाला असून मुख्यमंत्री रेड्डी यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले आहेत. रामचंद्र राव म्हणाले, काँग्रेस पक्ष नेहमीच हिंदूंची थट्टा करत असतो. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देतात.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बंदी संजय कुमार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही रेड्डी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. किशन रेड्डी म्हणाले की, एमआयएम बरोबर काँग्रेसची मैत्री असल्यामुळेच ते हिंदू आणि हिंदू देवी-देवतांबद्दल अहंकारांने भरलेली टिप्पणी करत आहेत. तेलंगणातील हिंदूंनी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. रेवंत रेड्डी आणि काँग्रेस पक्षाला आता हिंदूंची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे.
तेलंगणा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी म्हटले की, एमआयएमसमोर झुकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न दिसतो. रेवंत रेड्डी यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांचा पक्ष मुस्लिमांचा पक्ष आहे. काँग्रेसच्या मनात हिंदूंबद्दल मोठा द्वेष दिसून येतो.
