Telangana crime news report : ऑनलाईन जुगाराच्या व्यसन आणि त्यामुळे कर्जाचा डोंगर यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे. या तरुणाने ५५ वर्षीय महिलेचं अपहरण करून तिच्याकडचे दागिने लुटले आणि तिला तेलंगणातील करीमनगरमधील एका शेतातील विहिरीत ढकलून दिलं. सुदैवाने त्या महिलेला पोहता येत असल्याने, विहिरीतील पाण्याच्या पंपाच्या पाईपला २१ तास धरून राहिली, त्यामुळे ती बचावली. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

१ जुलै रोजी करीमनगर येथील जी. लक्ष्मीही महिला कामाच्या शोधात शहरातील टॉवर सर्कल जवळील लेबर अड्ड्यावर गेली होती. तिथे करीमनगरमधील गोल्लापल्ली गावचा रहिवासा आणि पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा आरोपी डी. दिनेश रेड्डी याने लक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रोजंदारीवर कामाला ठेवलं. तो पीडितेला रॅपिडो बाईकवरून थिम्मापूरपर्यंत घेऊन गेला. तिथून त्याने तिला स्वतःच्या बाईकवर बसवलं आणि शहरापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या नुस्तुलपूर गावात नेलं. तिथे शेतात काम करायचे आहे, असं त्याने तिला सांगितलं होतं.

एका निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपीने पीडितेला मारहाण केली आणि तिच्याकडील ५ ग्रॅम सोने आणि २० ग्रॅम चांदीचे दागिने लुटले. करीमनगरचे पोलीस आयुक्त गौश आलम यांनी सांगितलं, “चोरी केल्यानंतर त्याने पीडितेला शेतातील एका विहिरीत ढकलून दिलं. १ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता तिला विहिरत ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपर्यंत तिने विहिरीतील दोरी आणि पाईप धरून स्वतःचा जीव वाचवला, कारण तिला पोहता येत होतं. नंतर शेतकऱ्यांनी तिला पाहिले आणि तिची सुटका केली.”

पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, फोन डेटाचे विश्लेषण केले आणि शनिवारी दिनेश रेड्डीला अटक केली. पोलीस आयुक्तांनी पुढे सांगितलं की, “आरोपीला ऑनलाईन जुगाराचं व्यसन जडलं होतं आणि त्यात त्याचे ४ लाख रुपये बुडाले होते. त्याने विविध लोन ॲप्सच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने चोरीचा हा कट रचला होता.” आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी करीमनगरमधील एका सराफाकडून चोरीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू त्याच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.