तेलंगणातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून तब्बल ३०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याप्रकरणी तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. संकिरेड्डी भीम रेड्डी असे अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षक (DSP) दर्जाच्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

डीएसपी भीम रेड्डी हे सध्या हैदराबाद येथील पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेस विभागात कार्यरत होते. एसीबीच्या पथकाने त्यांच्या इब्राहिमबाग येथील ‘वेसेला मेडोज’ या आलिशान निवासस्थानातून सोमवारी संध्याकाळी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना विशेष एसीबी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

१६ ठिकाणांवर एकाच वेळी छापे

भ्रष्टाचाराच्या या मोठ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसीबीच्या पथकाने २ जुलै रोजी तेलंगणा आणि शेजारील कर्नाटक राज्यातील एकूण १६ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते. यामध्ये भीम रेड्डी यांचे घर, त्यांचे नातेवाईक, मित्र आणि त्यांच्या बेनामी भागीदारांच्या ठिकाणांचा समावेश होता. या धडक कारवाईनंतर अखेर सोमवारी (६ जुलै) त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली.

जप्त केलेल्या मालमत्तेची अवाक करणारी यादी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात डीएसपी भीम रेड्डी यांच्याकडे उत्पन्नाच्या साधनांपेक्षा तब्बल ३०० कोटी रुपयांची अधिकची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

स्थावर मालमत्ता (प्लॉट्स, फ्लॅट्स आणि जमिनी):

  • हैदराबादच्या इब्राहिमबागमध्ये एक आलिशान व्हिला.
  • टेलिकॉम नगरमध्ये एक तीन मजली (G+2+Pent House) इमारत आणि एक फ्लॅट.
  • गचीबोवली आणि तेल्लापूर भागात एकूण ३ निवासी फ्लॅट्स.
  • मणिकोंडा येथील कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये हिस्सा आणि ३००० स्क्वेअर फुटांची व्यावसायिक जागा.
  • प्रगती रिसॉर्ट्स, नागोळे आणि पठाणचेरू भागात मोठे निवासी प्लॉट्स.
  • संगारेड्डी, विकाराबाद आणि मुचिंतला येथे एकूण अंदाजे १० एकर शेतजमीन.
  • कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ४४ एकर शेतजमीन आणि बंगळुरूच्या देवनहल्ली भागात १ एकर जमीन.

रोख रक्कम, सोने आणि बँक बॅलन्स:

  • डीएसपी भीम रेड्डी यांच्या घरातून ३.६० लाख रुपयांची रोकड, तर त्यांच्या बेनामीदाराच्या घरातून ४० लाख रुपयांची रोकड जप्त.
  • तब्बल २ किलो सोन्याचे दागिने आणि २० किलो चांदीच्या वस्तू जप्त.
  • ‘श्री राघवेंद्र रॉक सँड मिनरल्स’ या कंपनीत ७५ लाख रुपयांची गुंतवणूक.
  • वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे १९ लाख ९१ हजार रुपयांची शिल्लक.

‘त्या’ एका डायरीनं कसा गेम उलटवला?

या संपूर्ण कारवाईत एसीबीच्या हाती लागलेली एक वैयक्तिक डायरी सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात भीम रेड्डी हे आपल्या पत्नीसोबत ‘चारधाम यात्रेला’ गेले होते. या यात्रेला निघण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हाताने एक डायरी लिहिली होती.

या डायरीमध्ये त्यांनी गोळा केलेली सर्व मालमत्ता, विविध ठिकाणच्या गुंतवणुकी, देणेकरी आणि त्यांच्या बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. धक्कादायक बाब म्हणजे, यात्रेदरम्यान काही अघटित घडल्यास मुलांना कळावं म्हणून त्यांनी या डायरीचे स्कॅन केलेले पेजेस व्हॉट्सॲपद्वारे आपल्या दोन्ही मुलांना पाठवले होते.

हाच पुरावा एसीबीच्या हाती लागला आणि या डायरीच्या आधारे अधिकाऱ्यांनी भीम रेड्डी यांच्या काळ्या साम्राज्याचा एका झटक्यात पर्दाफाश केला. या मोठ्या कारवाईमुळे तेलंगणा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.